धारावीमधील महाराष्ट्र निसर्ग उद्यान वाचविण्यासाठी शनिवारी पर्यावरणप्रेमी मुंबईकर रस्त्यावर उतरले. शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पक्षासह डझनभर स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी शनिवारी निसर्ग उद्यानावर धडक मारली. हे उद्यान एका खासगी कंपनीच्या घशात घालण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने खेळलेला डाव हाणून पाडण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
महाराष्ट्र निसर्ग उद्यान एका खासगी कंपनीच्या मुठीत देण्याबाबत एमएमआरडीएत सुरू असलेल्या हालचाली ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी या उद्यानावर धडक देत एमएमआरडीए आणि शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा दिला. शिवसेना, काँग्रेस, आम आदमी या राजकीय पक्षांबरोबरच आवाज फाऊंडेशन, स्प्राऊट्स, ग्रीन इन्फोसिया, भवन्स नेचर सेंटर्स, मुंबई रोज आदी स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या उद्यानात बैठक घेऊन कोणालाही न विचारता निसर्ग उद्यानाच्या पुनर्विकासाबाबत एमएमआरडीएने ओआरएफशी केलेला करार रद्द करावा अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या प्रश्नात लक्ष घाऊन हे उद्यान खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न रोखावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे या प्रश्नावर मुंबईकरांमध्ये जनजागृती करून हा लढा अधिक तीव्र करण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासह शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे हे उद्यान उभारण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सुमेरा अब्दुलअल्ली, शांता चटर्जी, हिमांशू जोशी, आनंद पेंढारकर आदी या वेळी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 6:39 am