नैराश्येपोटी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळे येथील तरुणाचा जीव सतर्क फेसबुक आणि मुंबई सायबर पोलिसांनी वाचवला. रविवारी रात्री आठच्या सुमारास फेसबुकने दिलेल्या त्रोटक महितीआधारे सायबर पोलिसांनी १० मिनिटात या तरुणाचे नाव, नेमका पत्ता आदी तपशील मिळवत धुळे पोलिसांना सतर्क केले.

सायबर पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर पोचलेल्या धुळे पोलिसांना जखमी अवस्थेत हा तरुण सापडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मुंबई सायबर पोलिसांनी नेमकी माहिती दिल्याने जखमी तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देणे शक्य झाले. अन्यथा तरुणाचा जीव वाचविणे अशक्य झाले असते, अशी माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली.

ज्ञानेश पाटील (२३) असे या तरुणाचे नाव असून रविवारी रात्री त्याने धुळे येथील निवासस्थानी आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रसंग त्याने फेसबुकद्वारे सर्वदूर पसरेल(फेसबुक लाईव्ह) अशी व्यवस्था केली. ही ध्वनिचित्रफीत फेसबुकच्या आर्यलड येथील मुख्यालयाने पाहून पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना कळवले. ज्ञानेशचे फेसबुक खात्याला जोडलेले तीन मोबाइल क्रमांकही दिले.

सायबर पोलिसांनी या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिन्ही मोबाइल बंद होते. करंदीकर यांनी दोन पथके तयार करत या तरुणाचा पत्ता शोधण्यासाठी धडपड सुरू केली. पथकातील सहायक निरीक्षक रवी नाळे यांनी अवघ्या १० मिनिटांत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणांचे नाव आणि नेमका पत्ता शोधला. हे तपशील करंदीकर यांनी धुळे येथील महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अधीक्षक पंडित यांना दिले. पुढल्या पाच मिनिटांत धुळे पोलिसांनी ज्ञानेशचे घर गाठले.

पाचवी यशस्वी कारवाई

मुंबई सायबर पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांत ज्ञानेशप्रमाणे अन्य चार तरुणांचा जीव वाचवला. यात टाळेबंदीत नोकरी सुटल्याने निराश झालेला दिल्लीतील आचारी(शेफ), पालकांशी भांडण करून मुंबईत आलेली कोलकात्याची महिला, इन्स्टाग्राम आधारे सर्वदूर पसरलेल्या आक्षेपार्ह छायाचित्रांमुळे टोकाचे पाऊल उचलण्याच्या बेतात असलेली विद्यार्थिनी यांचा समावेश आहे.