शाळा आणि कंत्राटदार यांच्यातील सुरक्षा नियमावलीच्या अंमलबजावणीबाबतच्या कराराचे पत्र न दिल्याने शाळांच्या बसेसचे परवाने मंजूर करण्यास परिवहन विभागाने नकार दिला असून १ जानेवारीपासून शाळांच्या बसेस बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शाळा आणि कंत्राटदार यांच्यात झालेल्या सुरक्षा नियमावलीच्या अंमलबजावणीच्या कराराची प्रत बसच्या वार्षिक फिटनेसच्या वेळी सादर करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. ही प्रत दिली नाही तर फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येणार नाही तसेच संबंधित बसचा परवानाही निलंबित करण्यात येईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले होते.
शाळांच्या बसेसना लावण्यात आलेल्या सुरक्षा नियमावलीची अंमलबजावणी संबंधित बसमध्ये झाली आहे किंवा नाही, बसना वेग नियंत्रक लावण्यात आला आहे किंवा नाही, बसमध्ये विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी शाळांकडून नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच सर्व सुरक्षा नियम व्यवस्थित पाळण्यात येत आहेत किंवा नाहीत, याची पूर्ण माहिती या करारपत्रात ठळकपणे नमूद असली पाहिजे. मात्र अशा प्रकारचे करार करण्यासच शाळाचालकांनी नकार दिला.
अलीकडेच झालेल्या बैठकीमध्ये बस कंत्राटदारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी शाळाचालकांना असे करारपत्र देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केल्यानंतरही शाळाचालकांनी असे करार करण्यास आणि पत्र देण्यास नकार दिला.
परिणामी, आता शाळांच्या बसेसना वार्षिक परवाना मंजूर करणे आणि बसचे फिटनेस प्रमाणपत्र देण्यास परिवहन विभागाने नकार दिला आहे.बसेसना फिटनेस प्रमाणपत्र नसेल आणि बसच्या प्रवासी वाहन परवान्याचे नूतनीकरण झाले नसेल तर त्या बसमधील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, असे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळेच मोटार वाहन कायद्यानुसार धोकदायक असलेली वाहने जप्त करण्यात येतील.
शाळांच्या बसेसनी सर्व सुरक्षा नियमांची अंमलबजावणी केल्याबाबतचे पत्र शाळांनी दिल्यावरच आम्ही त्यांच्या परवान्याचे आणि फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण करू, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
परिणामी १ जानेवारीपासून शाळांच्या बसेस बंद होण्याची शक्यता असल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने जाहीर केले आहे.