मुंबई महापालिकेतील श्रमिक, हमाल, स्मशान कामगार, आया या ‘ड’ वर्गातील कामगारांसाठी फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या ऑनलाइन लेखी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा मुद्दा विधानपरिषदेत गुरुवारी चर्चेला आला. टक्केवारी, नफा-तोटा, गुणोत्तर, भागीदारी, मिश्र व्यवहारांची चाचणी घेणाऱ्या या प्रश्नपत्रिकांच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानपरिषद सभापतींनी दिले.

महापालिकेतील ‘ड’ वर्गातील १३८८ पदांसाठी राज्यभर होत असलेल्या ऑनलाइन परीक्षांमध्ये भारताचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, राष्ट्रीय चळवळ, राजकारण, संविधान, व्यापार या विषयांसोबतच मराठी व्याकरण व इंग्रजी या जटील विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार असल्याची बातमी लोकसत्तामध्ये २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली होती.

कामाचा भाग नसलेल्या विषयांचा अभ्यास करण्याची सक्ती उमेदवारांवर करण्यात आली, मात्र हे प्रश्न आठवीच्या स्तरावरील असल्याचे स्पष्टीकरण पालिका अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात ऑनलाइन प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा मुद्दा भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.  या प्रश्नांचे स्वरूप पाहिल्यावर विधानपरिषद सभापतींनी यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

  • महानगरपालिकेत ड संवर्गातील १३८८ पदांसाठी राज्यभरातून तब्बल २ लाख ८७ हजार ०८८ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज आले.
  • १५ ते २५ फेब्रुवारीदरम्यान प्रमुख जिल्ह्य़ांच्या ठिकाणी ऑनलाइन परीक्षा घेतली गेली. या पदाच्या उमेदवारांसाठी प्रथमच लेखी परीक्षा घेतली गेली असून या ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आला होता.

परीक्षेतील प्रश्न

  • भारताचे ४४ वे सरन्यायाधीश कोण?
  • ८८ नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?
  • फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या परागसिंचनास काय म्हणतात?
  • गायनेशियम म्हणजे काय?
  • लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या व्हिनेगरमध्ये काय असते?
  • सिरीकल्चर कशाशी संबंधित आहे?
  • देशातील कोणत्या भागातून एकतारा, दोतारा यांचा उगम झाला?
  • भारतीय रुपयाला अधिकृत चिन्ह . या दिवशी मिळाले.
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सत्र .. इथे भरले.
  • आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे पाढे म्हटले. उद्देश विस्तार सांगा.
  • स्त्री या शब्दांचे समानार्थी शब्द किती? आत्मजा, सुता, ललना, नारी, यामिनी, महिला, वनिता
  • दहा रुपयांचे पेरू – यात षष्ठी विभक्तीतून कोणता अर्थबोध होतो?