महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदाच्या भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या जागांवर बोगस उमेदवारांची शिफारस करण्यात आली असल्याचे समोर येत आहे. माजी सैनिक म्हणून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अवघे २३-२४ वर्षे वय असणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत. या उमेदवारांनी शिक्षण कधी पूर्ण केले, सैन्यात भरती कधी झाले आणि एवढय़ा कमी वयात निवृत्त कसे झाले या मुद्दय़ांचा ताळमेळच नसल्याचे दिसत आहे. आयोगाकडून मात्र या प्रक्रियेत कोणताही घोळ झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासकीय पदांवरील भरतीसाठी परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांमध्ये बोगस उमेदवार बसत असल्याच्या, गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येतात. उमेदवारांनी परीक्षा काटेकोरपणे व्हाव्यात यासाठी आंदोलनेही केली. आयोगाने मात्र आतापर्यंत सगळे आरोप नाकारले आहेत. आता आयोगाने घेतलेल्या परीक्षेत आणखी एक अजब प्रकार समोर येत आहे.

आयोगाकडून सहायक मोटार वाहन निरीक्षकपदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल गेल्या आठवडय़ात जाहीर झाला. भरतीच्या नियमाप्रमाणे यातील काही जागा या माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या जागांवर आयोगाने १२४ उमेदवारांची शिफारस केली. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांमधील काही उमेदवारांचे वय हे आज घडीला २३ ते २७ वर्षे आहे. एवढय़ा कमी वयात शिक्षण पूर्ण करून, सैन्यात भरती होऊन नंतर निवृत्तीही घेतल्याचे दिसत आहे. अगदी १९९०, ९३, ९५ जन्मसाल असलेल्या अनेक उमेदवारांच्या शिफारसी आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. आयोगाने शिफारस केलेले हे उमेदवार बोगस असल्याचा आरोप करण्यात येत आहे. असे साधारण ८ ते १० उमेदवार असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. या परीक्षांबाबत आणि आयोगाच्या कारभाराबाबत तक्रार करणाऱ्या योगेश जाधव यांनी सांगितले, ‘या परीक्षेत नेमणुकांसाठी उमेदवारांकडून पैसे घेण्याचे प्रकार घडले असल्याचे परीक्षार्थीकडून सांगण्यात येत आहे. आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांमध्ये कमी वयाचे अनेक उमेदवार दिसून येतात. याबाबत तक्रार करण्यात आली आहे.’

आयोगाचे काय म्हणणे?

उमेदवारांमध्ये या भरतीबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर आयोगाने या प्रकरणाचा खुलासा केला आहे. ‘सहायक मोटार वाहन निरीक्षकपदासाठी मुलाखती नसल्यामुळे प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी उमेदवारांना आयोगाच्या कार्यालयात बोलावण्यात येत नाही. शिफारस केलेल्या उमेदवारांची नेमणूक करण्यापूर्वी माजी सैनिक प्रवर्गाच्या आणि वयाच्या दाव्यासह शैक्षणिक आर्हता, अनुभव, आरक्षण अशा सर्वच बाबींची पडताळणी करून खात्री झाल्यानंतरच नेमणुका करण्यात याव्यात,’ अशा सूचना आयोगाकडून शासनास केल्या जातात. इतर उमेदवारांच्या तुलनेत माजी सैनिकांचे वय जास्त असणे अपेक्षित असले तरी केवळ उमेदवारांचे वय कमी आहे म्हणून त्यांची पडताळणी न करता त्यांना अपात्र ठरवणे योग्य नाही. काही वेळी सैनिकांना अल्पवयातही सेवेतून मुक्त करण्यात येऊ शकते. उमेदावारांची पडताळणी करूनच त्यांच्या नेमणुका होणार आहेत,’ अशा आशयाचे स्पष्टीकरण आयोगाने प्रसिद्ध केले आहे.

माजी सैनिकांसाठी राखीव जागांवर कायमच गोंधळ?

यापूर्वी कृषिसेवक पदाच्या भरती परीक्षेमध्येही माजी सैनिकांसाठी राखीव जागांवर शंकास्पद शिफारसी झाल्या होत्या. २२-२३ वर्षांच्या मुलींची शिफारस या पदावरील नेमणुकांसाठी करण्यात आली होती. मात्र ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नाही, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली होती. कालांतराने या परीक्षेतील सर्वच गोंधळ चव्हाटय़ावर आल्यामुळे नव्याने शिफारस याद्या तयार करण्यात आल्या होत्या.