X

आमदार निवास दुरुस्तीत कोटय़वधींचा घोटाळा

कामे न करताच बिल काढले, दोघे निलंबित

कामे न करताच बिल काढले, दोघे निलंबित

विधानभवन परिसरातील धोकादायक आमदार निवासस्थानाच्या दुरुस्तीत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कामे न करताच खोटी बिले काढून अफरातफर केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले असून कार्यकारी अभियंत्याची तडकाडकी बदली करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

मनोरा आमदार निवासस्थान धोकादायक ठरले असून ते खाली करण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यापूर्वी या आमदार निवासस्थानात दुरुस्ती करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात घोटाळा केल्याच समोर आले आहे. या अभियंत्यांनी आमदारांच्या खोल्यांची दुरुस्ती न करताच खोटय़ा निविदा प्रकाशित करून, खोटे करारनामे आणि कार्यादेश दाखवून सुमारे तीन कोटी ७० लाख रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार चरण वाघमारे व अन्य काही आमदारांनी केली होती. त्याची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार अधीक्षक अभियंता अरविंद सूर्यवंशी यांच्यामार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. त्यात उपअभियंता भूषण फेगडे आणि कनिष्ठ अभियंता धोंडगे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हा घोटाळा केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आल्याचे समजते. या अभियंत्यांनी ज्या आमदारांच्या खोल्यांची दुरुस्ती केल्याचे दस्तावेज तयार करून बिले काढली आहेत. प्रत्यक्षात खोल्यांची दुरुस्तीच करण्यात आलेली नसल्याचेही पुढे आले आहे. चौकशीचा समेमिरा मागे लागताच कागदपत्रात फेरफार करण्याचा प्रयत्नही या अभियंत्यांनी केल्याचे समोर आले असून, दोघांना निलंबित करण्याचे आदेश पाटील यांनी दिले. कार्यकारी अभियंता वाळके यांची  बदली करण्यात आली असून  अहवालाच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.

Outbrain