News Flash

तूरडाळ विक्रीत भेदभाव!

राज्यात २०१६-१७ मध्ये मोठय़ा प्रमाणावर तुरीचे उत्पादन झाले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रास्त भाव दुकान, खुल्या बाजारात ५५; सरकारी रुग्णालये, शाळांना मात्र ८० रुपये

राज्य सरकारने खरेदी केलेल्या २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची डाळ करुन विकण्याच्या सहकार व पणन विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. मात्र या डाळविक्रीमध्ये सरकारने भेदभाव ठेवला आहे. रास्तभाव दुकानांमधून आणि खुल्या बाजारातून ही डाळ ५५ प्रतिकिलो दराने विकली जाणार आहे, तर शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन, शासकीय रुग्णालये, अंगणवाडय़ांमधील मुलांसाठी ८० रुपये किलोने डाळीची विक्री करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने त्यावरही मान्यतेची मोहोर उमटवली आहे.

राज्यात २०१६-१७ मध्ये मोठय़ा प्रमाणावर तुरीचे उत्पादन झाले. मात्र त्याचवेळी बाजारातील तुरीचे भाव पडले होते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राच्या हमीभावाने म्हणजे ५०५० रुपये प्रति क्विंटल दराने तूर घरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाफेड व राज्य सरकारने मिळून राज्यातील एकूण ७५ लाख क्विंटल तूर खरेदी केली. त्यात राज्य शासनाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीचा समावेश आहे. आता ही तूर विकण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत १० लाख क्विंटल, तर उर्वरित सात ते आठ लाख क्विंटल डाळ शासकीय विभाग व खुल्याबाजारात विकली जाणार आहे. शालेय शिक्षण विभाग (शाळांसाठी)- ३,००,००० क्विंटल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (दवाखाने, रुग्णालये)-२१६० क्विंटल आणि महिला व बालविकास विभाग (अंगणवाडय़ा) ३, ६०, ६०० क्विंटल या प्रमाणात तूरडाळीची विक्री केली जाणार आहे. राज्य शासनाच्या इतर विभागांनाही तूरडाळ विकण्यात येणार आहे.

तोटा सहन करून..

राज्यातील रास्तभाव दुकांनांमधून ५५ रुपये किलो दराने तूरडाळ विकण्यात येणार आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना या दराने ही डाळ खरेदी करता येईल. याच दराने खुल्या बाजारातही तूरडाळ विकल्यास २८ रुपये प्रतिकलो तोटा सहन करावा लागणार आहे. एकूण ३१३ कोटी रुपयांचा तोटा होईल, असा अंदाज आहे.

पाच रुपयांची सूटही..  राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करुन साधारणत त्याची १७ ते १८ लाख क्विंटल तूरडाळ उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. ही तूरडाळ राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेसाठी, अंगणवाडय़ांमधील मुलांच्या पोषण आहार योजनेसाठी, तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये ८० रुपये प्रतिकिलो दराने विकण्याचा निर्णय घेण्यात आला. एकदम ५० किलो डाळ खरेदी केल्यास ७५ रुपये प्रतिकिलो दराने विकण्यास मान्यता देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 3:44 am

Web Title: scam in tur dal sale tur dal price rate
Next Stories
1 सहा खासदार, २१ आमदार लवकरच निवृत्त
2 पहिल्या देशी बनावटीच्या विमानावर अखेर शिक्कामोर्तब
3 कोकण रेल्वेच्या पारदर्शक डब्याला भरघोस प्रतिसाद
Just Now!
X