News Flash

सरकारी रुग्णालयात साध्या तापाच्या औषधांचाही तुटवडा

पॅरासिटामोलचा पाच दिवसांचा उपचाराचा कालावधी निश्चित करून औषधे दिली जातात.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : साध्या तापाची औषधेही नाहीत म्हणजे काय? तुम्ही डॉक्टर मंडळी औषधांचेही पैसे खाता का? या आणि अशा टीकारोपांचे धनी सध्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर बनले आहेत. तापासाठी सार्वत्रिक वापरल्या जाणाऱ्या ’पॅरासिटामोल’च्या गोळ्या तसेच लहान मुलांसाठीचे सिरपही अनेक रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे ते बाहेरून आणण्यासाठी लिहून देण्याशिवाय डॉक्टरांकडे पर्याय राहिलेला नाही. परिणामी रुग्णांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या शिव्याशापांचा नसता ‘ताप’राज्यातील अनेक भागातील  आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना सहन करावा लागत आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनीही औषधांची कमरता असल्याचे मान्य करीत महिनाभर पुरतील एवढाच पॅरासिटामोलचा साठा असल्याचे मान्य केले आहे.  राज्याच्या आरोग्य विभागात एकीकडे डॉक्टरांची तीव्र कमतरता आहे, आरोग्यमंत्री दीपक सावंत या समस्येवर तातडीने भूमिका घेत नाहीत, तर दुसरीकडे पुरेशी औषधेही उपलब्ध नसून योग्य नियोजनाअभावी ही भीषण परिस्थिती उद्भवल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या औषधांचाच नव्हे तर तापावर द्यावयाच्या पॅरासिटामोलच्या गोळ्याही नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पाच दिवसांच्या औषधांऐवजी तीन दिवसांचीच औषधे देण्यात येत असल्याचे नंदुरबार, धुळे व जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या औषधांसाठी यंदा सुमारे ५० कोटी रुपयांच्या पॅरासिटामोल औषधांची खरेदी करण्यात येणार असून त्याच्या निविदा लवकरच जाहीर होतील, असे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अनेक लोकप्रतिनिधींनी औषधांचा तीव्र तुटवडा असल्याच्या तक्रारी केल्या असून मुख्यमंत्र्यांनीही औषधांच्या एकूण परिस्थितीची आपल्याकडून माहिती घेतल्याचेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

राज्यातील एकूणच औषध खरेदीची जबाबदारी ही हाफकिन संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात हाफकिनमध्ये औषध खरेदीसाठीची व्यवस्था १५ ऑगस्ट २०१७ रोजी सुरु झाली. त्यानंतर नोव्हेंबर पासून प्रत्यक्षात काम सुरु झाले असून एकूण खरेदीची व निविदा काढल्यापासून औषध उपलब्ध होण्याचा कालावधी लक्षात घेतल्यास आगामी आठवडय़ात निविदा प्रसिद्ध झाल्या तरी प्रत्यक्ष औषध पुरवठा होण्यास किमान दोन ते चार महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे आरोग्य संचलनालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर सध्या अवघा एक महिन्याचाच पॅरासिटामोलच्या गोळ्याचा असलेला साठा व दहा टक्के खरेदीची दिलेली परवानगी लक्षात घेतल्यास पुढेही सुरळीत औषध पुरवठा सुरु होण्यास सप्टेंबर महिना उजाडेल असेही येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागात सध्या सुमारे १६ हजार पदे रिक्त असून यात आरोग्य संचालनालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुमारे २६११ पदे रिक्त आहेत. यात जिल्हा शल्यचिकित्सकांची ३७७ तर विशेषज्ञांची ४६६ पदे भरण्यातच आलेली नाहीत. याशिवाय डॉक्टरांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नतीचे अनेक प्रश्न गेली अनके वर्ष रखडले असून ते सोडविण्यात आरोग्यमंत्री दीपक सावंत नापास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 औषध वाटपात कपात.

राज्यात एकूण १८१४ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४३५ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, २३ जिल्हा रुग्णालये, १२ स्त्री रुग्णालये आणि साठ खाटांची चार सामान्य रुग्णालये तसेच १०,५८० उपकेंद्रे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सरासरी १०० ते २०० रुग्ण रोज येतात तर जिल्हा रुग्णालयात एक हजार रुग्ण उपचारासाठी रोज येत असतात. यातील तापाच्या रुग्णांना अँटिबायोटिक्स तसेच पॅरासिटामोलचा पाच दिवसांचा उपचाराचा कालावधी निश्चित करून औषधे दिली जातात. मात्र सध्या या औषधांचा तुटवडा लक्षात घेऊन अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवसांचीच औषधे दिली जात असल्याचे काही डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

औषध वाटपात कपात.

राज्यात एकूण १८१४ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४३५ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, २३ जिल्हा रुग्णालये, १२ स्त्री रुग्णालये आणि साठ खाटांची चार सामान्य रुग्णालये तसेच १०,५८० उपकेंद्रे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सरासरी १०० ते २०० रुग्ण रोज येतात तर जिल्हा रुग्णालयात एक हजार रुग्ण उपचारासाठी रोज येत असतात. यातील तापाच्या रुग्णांना अँटिबायोटिक्स तसेच पॅरासिटामोलचा पाच दिवसांचा उपचाराचा कालावधी निश्चित करून औषधे दिली जातात. मात्र सध्या या औषधांचा तुटवडा लक्षात घेऊन अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवसांचीच औषधे दिली जात असल्याचे काही डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 3:40 am

Web Title: scarcity of fever medicines in government hospital of maharashtra
Next Stories
1 सटवाजीराव डफळे यांची समाधी प्रकाशात
2 सांगलीच्या ऊर्वी पाटीलकडून सरपास शिखरावर तिरंगा
3 एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांनाही ‘आरटीई’मध्ये प्रवेश
Just Now!
X