रखडलेल्या परीक्षा, रेंगाळलेले मूल्यमापन यांमुळे यंदा शालान्त परीक्षेपासून अगदी विद्यापीठांच्या परीक्षा, प्रवेश परीक्षांचे निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक कोलमडणार असल्याचे दिसत आहे.

करोनाच्या धास्तीने यंदाच्या शैक्षणिक वर्षांचे लवकर सूप वाजले. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द झाल्या. मात्र नववी, अकरावीच्या परीक्षा रखडल्या आहेत. दहावीचीही एका विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परीक्षांचीही तील गत आहे. राज्यमंडळाच्या बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत. राज्यमंडळाने दहावी आणि बारावीच्या झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन घरून करण्याची मुड्टाा शिक्षकांना दिली आहे. मात्र, अनेक ठिकाणी संचारबंदीमुळे शिक्षकांना केंद्रावरून उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणे शक्य झाले नसल्याची माहिती शिक्षकांनी दिली. त्यामुळे मूल्यांकनाच्या कामानेही गती घेतलेली नाही. त्याचप्रमाणे बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षाही लांबल्या आहेत. त्याचेही निकाल दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार लागण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. उशीरा वर्ष सुरू झाल्यामुळे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडणार असल्याचे दिसत आहे.

केंद्रीय मंडळाचे शैक्षणिक वर्ष बदलणार?

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांचे नवे वर्ष एप्रिल महिन्यातच सुरू होते. आधीचे वर्ष संपवून एप्रिलमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांचे वर्ग भरवले जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांना मे महिन्यात सुट्टी दिली जाते आणि जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू होतात. मात्र, यंदा अध्र्याहून अधिक एप्रिल महिना शाळा बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षांची रचना बदलण्याची शक्यता आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मंडळाच्या जवळपास सात ते आठ विषयांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांचे निकालही लांबणार आहेत. त्याचाही परिणाम राज्यातील प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. देशपातळीवरील आणि विद्यार्थ्यांची लाखोंच्या घरात विद्यार्थी संख्या असलेली मंडळे असल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया या मंडळांचे निकाल जाहीर झाल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही.

करोना विषाणू संसर्गाचा येत्या शैक्षणिक वर्षांतील प्रवेशांवर परिणाम होणार आहे. सुटीचा काळ कमी करणे, परीक्षा पद्धतीमध्ये बदल करणे, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी श्रेयांक गुण पद्धती (चॉइस बेस्ड क्रे डिट सिस्टिम) लागू के ल्याने विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेऊन निकाल जाहीर करणे अशा पर्यायांचा विचार करावा लागेल.

डॉ. नितीन करमळकर, कुलगुरु  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ