महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यर्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षांच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यपीठाने जाहीर केले होते, मात्र विद्यर्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक पंचेचाळीस दिवस आधी जाहीर करावे आणि दरवर्षीप्रमाणे दोन पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात यावे, याबाबत गुरूवारी शासनाने आदेश जारी केले.

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. वैद्यकीय परीक्षांबाबतची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मार्गदर्शक तत्वे व सूचना आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठ तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यतील परीक्षा केंद्रावर त्यांना परीक्षा देता येईल. विद्यार्थी पालक यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेऊन नियोजित परीक्षा पद्धती अधिक सोपी आणि सोयीची करण्याचा प्रयत्न अजूनही करण्यात येत आहे. तरीही अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षा याबाबत ठाम भूमिका घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

शासनाच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होणार असून सर्व वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर  परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.