ग्राहकांची माहिती चोरून भामटय़ांना विकणारी टोळी सक्रिय

जयेश शिरसाट मुंबई : येत्या सुट्टीत मलेशियामध्ये पर्यटनाला जाण्याचे बेत आखत असाल तर सावधान! तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डवरून व्यवहार करताना अधिक खबरदारी घ्या. कारण ग्राहकांच्या कार्डाचा तपशील चोरणारी ‘स्कीमर’ यंत्रे येथील अनेक दुकानांत बसवण्यात आली असून या यंत्रांतून चोरलेल्या माहितीची विक्री विविध देशांतील भामटय़ांना विकणाऱ्या टोळय़ा सक्रिय झाल्या आहेत. या माहितीच्या आधारे बनावट कार्डे तयार करून त्याचा गैरवापर केला जात असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या तपासातून समोर आली आहे.

गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अलीकडेच अशा भामटय़ांना गजांआड केले. या टोळीकडे परदेशी नागरिकांच्या कार्डाचे सर्व तपशील उपलब्ध होते. त्याआधारे त्यांनी बनावट कार्ड तयार केली. देशभरातील पर्यटनस्थळांवरील दुकानदारांना हाताशी धरले. दुकानदारांकडील स्वाईप यंत्रांवर बनावट कार्डाच्या मदतीने लाखोंचे व्यवहार केले. त्यासाठी परदेशी नागरिकांनी दुकानात वस्तू खरेदी केल्याचा आभास निर्माण केला गेला. दुकानदाराच्या खात्यात आलेले पैसे कमिशन देऊन भामटय़ांनी स्वत:कडे घेतले. या भामटय़ांनी अमेरिका, चीन आणि मध्य पूर्वेतील नागरिकांचीच बनावट कार्ड तयार केल्याचे तपासातून स्पष्ट झाले.

भामटय़ांच्या टोळीला हे तपशील पुरवणारा मुख्य आरोपी मनोज कुमार याला पोलीस निरीक्षक संतोष गायकर, लक्ष्मीकांत साळुंखे, धीरज कोळी आणि पथकाने चेन्नई विमानतळावरून अटक केली. मनोजच्या चौकशीतून कार्ड तपशील, मलेशियात जगभरातून आलेल्या पर्यटकांना असलेला संभाव्य धोका याबाबत बरीच माहिती पुढे आली. गेल्या काही वर्षांमध्ये मनोज सातत्याने मलेशियातील टोळ्यांच्या संपर्कात होता. मनोजने दिलेल्या माहितीनुसार मलेशियात तपशील चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांनी पर्यटक कार्डाद्वारे जेथे कोठे आर्थिक व्यवहार करू शकतील त्या प्रत्येक ठिकाणी स्कीमर यंत्रे बसवली आहेत. स्वाईप यंत्र, एटीएम यंत्रात बसवलेले स्कीमर कार्डाचे तपशील आपोआप आपल्याकडे घेते. सूक्ष्म कॅमेऱ्याने संबंधित कार्डासोबतचा चार अंकी पिन क्रमांक टिपला जातो. पुढे अमेरिका, चीन, मध्य पूर्वेतील देश, भारत अशा विविध देशांमधील नागरिकांच्या तपशिलांची स्वतंत्र यादी तयार करून विकली जाते. मुंबईत सक्रिय असलेले अन्य भामटेही मलेशियातील टोळीच्या संपर्कात आहेत.

डेबिट, क्रेडिट कार्डाच्या तपशिलांचे मुख्य उगमस्थान मलेशिया आहे. तपशिलांची चोरी मलेशियातच होते, अशी माहिती अटक आरोपीच्या चौकशीतून पुढे आली आहे. त्याची खातरजमा करून पुढील तपास सुरू असल्याचे, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला सांगितले.

मध्य पूर्वेतील तपशील अडीचशे डॉलरना

मलेशियात तपशिलांची बाजारपेठ आहे. तेथे मागणीप्रमाणे त्या त्या देशातील नागरिकांचे चोरलेले तपशील सहज उपलब्ध होतात. मनोज गेल्या अनेक वर्षांपासून मध्य पूर्वेतील देश, अमेरिका, चीन याच देशांचे तपशील विकत घेत होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य पूर्वेतील नागरिकांचे तपशील सर्वात महाग विकले जातात. त्याखालोखाल अमेरिका, चीन आणि अन्य देशांचा क्रमांक लागतो. भारताचे तपशील सर्वात स्वस्त मिळतात. मनोजने मध्य पूर्वेतील एका नागरिकाचे तपशील अडीचशे डॉलरना विकत घेतले. अमेरिकेच्या नागरिकाचे १५ डॉलरना तर भारतीयाचे दोन ते तीन डॉलरना. असे खंडीभर तपशील विकत घेऊन त्याने ते मुंबईसह भारतात सक्रिय असलेल्या विविध टोळ्यांना चढय़ा भावांना विकले.

७,२२,१४१

२०१५ पासून मलेशियात पर्यटनाला गेलेल्या भारतीयांची संख्या

०६ 

मलेशियातील सर्वाधिक पर्यटक संख्या असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक