शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे २०१६पासून कमी होईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. गुणवत्ता व कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज असली तरी त्यासाठी पाठीवरील दप्तराचे ओझे वाढवणे हा पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठी विलेपार्ले येथील एका शाळेत सकाळी जाऊन विद्यार्थी व दप्तराचे ओझेच विनोद तावडे यांनी वजनकाटा घेऊन मोजण्याचा प्रयोगही त्यांनी केला.

विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेला तसेच महापालिकेच्या दीक्षित शाळेला आज सकाळी विनोद तावडे यांनी भेट दिली. थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून दप्तराच्या ओझ्याबाबत मुलांची मते समजावून घेतली, एवढेच नव्हे तर वजनकाटय़ावर मुलांचे वजन केले आणि हातात वेगळा वजनकाटा घेऊन दप्तराचेही वजन केले. बहुतेक मुलांच्या दप्तराचे वजन हे चार ते सहा किलो असल्याचे आढळून आल्याचे तावडे म्हणाले. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वीच तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. या समितीपुढे कोणत्या प्रकारे दप्तराचे वजन कमी करता येईल याची माहिती सादर करणार आहे. यापूर्वी पालिकेतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा उपक्रम राबवून शिवसेनेने दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. या योजनेचा आढावा घेऊ, असेही त्यांनी सांगितले.