चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे

नवी मुंबई, नाशिकमध्ये स्कूलबसमधून उतरल्यानंतर चिमुकल्यांचा अपघात घडल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्देश दिले असतानाही त्यांचे पालन होत नसल्याने बालहक्क आयोग आणि वेल्फेअर फस्र्ट फाऊंडेशनतर्फे गृह व परिवहन विभागाचे लक्ष वेधले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकार पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जारी करून हे अपघात रोखण्याच्या उपाययोजना करणार आहे.

स्कूलबसमध्ये असलेल्या सहायकाने मुलाला उतरविल्यावर रस्ता ओलांडून देणे नियमावलीनुसार आवश्यक आहे. पण बरेचदा त्याचे पालन होत नाही. चालकाच्या घाईमुळे अगदी स्कूलबसखालीही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे काही शाळांचे विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्याचे व उतरविण्याचे थांबे एकत्रित असावेत, तेथे फलक, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे असावेत, यासह शाळा, बसचालक, साहाय्यक व पालकांनीही कोणती काळजी घ्यायची, याविषयी गृह व परिवहन विभागाकडे सूचना देण्यात आल्या आहेत. बालहक्क आयोगातील तज्ज्ञ अ‍ॅड्. वर्षां रोकडे यांनी नुकतीच अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची भेटही घेतली. सरकार यासंदर्भात गंभीर असून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.