नर्सरीत शिकणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोनदा लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका स्कूल बस अटेंडंटला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईत २०१४ मध्ये ही घटना घडली होती. बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पोक्सो) कोर्टाने ५१ वर्षीय आरोपीला ही शिक्षा सुनावली.

याप्रकरणी विशेष सरकारी वकील मीरा चौधरी भोसले यांनी सांगितले की, प्रमुख साक्षीदारांमध्ये पीडित मुलगी आणि तिच्या आईचा समावेश होता. पीडित मुलगी सहा वर्षांची झाल्यानंतर तिला कोर्टासमोर सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी या पीडित मुलीने आपल्यावर घडलेला भयानक प्रसंग कोर्टासमोर कथन केला.

तिने कोर्टाला सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती स्कूल बसमध्ये एकटीच होती, त्यावेळी बसमध्ये ‘ब्ल्यू अंकल’ (निळ्या रंगाचा गणवेश घातलेला बस अटेंडंट) आणि ‘ब्राऊन अंकल’ (करड्या रंगाचा गणवेश घातलेला बस चालक) उपस्थित होते. मात्र, महिला अटेंडंट नव्हती. यावेळी ‘ब्लू अंकल’ने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बस अटेंडंट असलेल्या आरोपीने आपल्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचेही सांगत तीने आरोपीला कोर्टात ओळखले. तसेच पीडित मुलीच्या आईने देखील कोर्टाला सांगितले की, घटना घडली त्यावेळी बसमध्ये एक चालक आणि दोन अटेंडंट होते. आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगताना मुलगी आरोपीला ‘ब्लू अंकल’ म्हणून संबोधत होती. कारण त्याने निळ्या रंगाचा गणवेश घातलेला होता.

यापूर्वी पीडित मुलीच्या आईने ९ सप्टेंबर २०१४ रोजी कोर्टासमोर सांगितले होते तोच मुद्दा त्यांनी पुन्हा कोर्टासमोर कथन केला. सकाळी ११ वाजता शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीने आंघोळ केली, जेवण केले आणि ती झोपी गेली. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर शौचालयात गेल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर आईने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला किस्सा सांगितला. ‘ब्लू अंकल’ने तिला बसच्या शेवटच्या सीटवर नेले आणि तिथे लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. तसेच यापूर्वीही तिच्यासोबत असं झालं होतं का? असं आईने विचारल्यांतर तीने होय असे उत्तर दिले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिला लगेचच आपल्या फॅमिली डॉक्टरकडे नेले आणि तिची तपासणी करुन घेतली. त्यानंतर घरी आल्यानंतर घडलेली कहाणी आपल्या पतीला आणि सासऱ्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत संबधीत स्कूल बस अटेंडंटविरोधात तक्रार नोंदवली. दरम्यान, १० सप्टेंबर २०१४ रोजी तीन वर्षांच्या चिमुकलीला पोलीस ठाण्यात आरोपी समोर उभे केल्यानंतर तिने त्याला ओळखले होते.

दरम्यान, महिला स्कूल बस अटेंडंटने देखील यावेळी साक्ष दिली. सुरुवातीला तिने सांगितले की, शाळा सुटल्यानंतर मी मुलीला बसमध्ये घेतले तिला तिच्या जागेवर बसवले त्यानंतर बसमधून मी बाहेरही पडले नाही. त्यामुळे असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा तीने केला. तसेच आरोपीला ती वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या फिर्यादींच्या आरोपाचांही तिने इन्कार केला.