कर्मचाऱ्यांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आल्याने गेल्या चार दिवसांपासून बेस्टच्या बस मुंबईच्या रस्त्यांवर धावलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांच्या मदतीसाठी स्कूल बस संघटना पुढे आली आहे. या संघटनेने सुमारे १००० स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेसाठी उद्यापासून रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आणखी १००० खासगी बसही सेवा देण्यास तयार आहेत. स्कूल बस मालक संघटनेचे अनिल गर्ग यांनी ही माहिती दिली.

गर्ग म्हणाले, उद्या स्कूल बस रस्त्यावर उतरल्यानंतर या बसमधून प्रवास करताना १० किमीपर्यंत मुंबईकरांना २० रुपये भाडे आकारले जाईल. त्यानंतरच्या अंतरासाठी बेस्ट बस प्रमाणे भाडे आकारणी केली जाईल. तर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल. स्कूल बस मालक संघटना आणि मुंबई बस मालक संघटनेकडून ही सेवा दिली जाणार आहे.

आपल्या विविध मागण्यासाठी बुधवारपासून बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (बेस्ट) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बेस्टची एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. सुरुवातीला केवळ दोन दिवसांसाठी हा संप होणार होता. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बेस्ट कर्मचारी संघटनेच्या नेत्यांची बैठका निष्फळ झाल्याने यावर तोडगा निघू शकला नाही. मात्र, त्यामुळे मुंबईकरांना त्रासाला समोरे जावे लागत आहे. बस बंद असल्याने लोकल, रिक्षा, टॅक्सी आणि मेट्रोवरील ताण वाढला आहे.