रुग्णवाहिका अपुऱ्या पडू लागल्याने पालिकेचा निर्णय

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाबाधित आणि संशयित रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णवाहिकांची अपुरी संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या २५० मिनी बस व व्हॅन ताब्यात घेतल्या आहेत. या वाहनांचा वापर करोना संशयितांना विलगीकरण कक्षात नेण्या-आणण्यासाठी करण्यात येत आहे.

एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सहा जणांचा शोध घेण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. त्या दृष्टीने बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा मोठय़ा संख्येने शोध घेण्यात येत आहे. सौम्य, मध्यम लक्षणे वा लक्षणे नसलेले मात्र करोनाचा अहवाल होकारात्मक (पॉझिटिव्ह) आलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. प्रशासनाच्या वर्गवारीनुसार हे सर्व रुग्ण करोना संशयितांच्या गटात मोडतात. या सर्वाना करोना काळजी केंद्र-१, करोना काळजी केंद्र-२, संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये दाखल करण्यात येते.

प्रत्यक्षात करोनाची बाधा झालेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले संशयित यांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत. अनेक रुग्णांना तासन्तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता पालिकेने शाळा बसचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.  करोनाच्या संशयित रुग्णांची ने-आण करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या मिनी बस आणि व्हॅनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्कू ल बस ओनर्स असोसिएशनकडून उपलब्ध झालेल्या २५० मिनी बसगाडय़ा आणि व्हॅन पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. ही वाहने प्रत्येक विभाग कार्यालयाला गरजेनुसार उपलब्ध करण्यात आली आहेत. वाहनचालकांना करोना संशयितांमुळे बाधा होऊ नये यासाठी मिनी बस आणि व्हॅनमधील रचनेत थोडासा बदल करण्यात आला आहे. चालक आणि वाहनात बसलेला संशयित यांचा संपर्कच येऊ नये या दृष्टीने ही रचना करण्यात आली आहे. चालकाच्या पाठीमागचा भाग पत्र्याने बंदिस्त करून संसर्गाचा धोका टाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.