राज्यभरातील शाळा सुरू होण्याच्या मुहूर्तावर शाळेच्या बसगाड्यांची प्रस्तावित भाडेवाढ टळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी यासंबंधीचे आश्वासन देताना शाळेच्या सर्वप्रकारच्या बसगाड्यांना टोलमधून मुक्तता मिळणार असल्याचे सांगितले. यासाठी लवकरच मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून कायद्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी शुद्धीपत्र काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या ८ ते १५ दिवसांमध्ये याबाबतचा अंतिम निर्णय शासनाकडून जाहीर केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी शालेय बस संघटनेला दिले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय बस संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी शासनाला निर्णय घेण्यासाठी एका महिन्याचा अवधी दिला आहे.
खरं तर यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यासाठीचे कोणतेही ठोस लेखी आश्वासन सरकारकडून देण्यात आले नव्हते. ४५ दिवसांपूर्वी स्कुल बस संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना टोल माफ करण्याच्या विनंतीसाठी पत्रही पाठविण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस पाठपुरावा करूनही कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने शालेय बस संघटनेने सेवाशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांवर दरमहा ३०० रूपयांचा बोजा पडणार होता.