07 March 2021

News Flash

पावसाने उडवली दाणादाण, लोकल सेवा ठप्प; सरकारी सुट्टी जाहीर

रात्रभर झालेल्या पावसामुळे लोकल सेवा कोलमडली

सरकारने जाहीर केली सुट्टी

मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते मात्र मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसामुळे या लोकल सेवेचे तीन तेरा वाजवले आहेत. आज पहाटेपासूनच लोकल सेवा बंद असल्याच्या घोषणा विविध स्टेशनवर केल्या जात आहेत. डोंबिवली ते ठाणे हे स्लो लोकलने वीस मिनिटात कापले जाणारे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल्स ठाण्यापर्यंत मुंगीच्या गतीने जात असून त्यापुढे पुढील सूचना मिळेपर्यंत लोकलसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या लोकलसेवेला पावसाने ब्रेक लावला आहे.

दरम्यान गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आलं आहे.

 

डोंबिवली स्टेशन या ठिकाणी घोषणा दिल्या जात होत्या ज्यामध्ये मुंबईच्या दिशेने म्हणजेच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या ठाण्यापर्यंतच चालवण्यात येत आहेत असे सांगितले जात होते. पुढील सूचना मिळेपर्यंत ही लोकलसेवा स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात येत होते. सायन, कुर्ला आणि माटुंगा परिसरात रूळांवर पाणी साठल्याने आणि मुंबईत रात्रभर पाऊस पडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेतर्फे घोषित करण्यात आले. दरम्यान शाळा कॉलेजसनाही सुट्टी देण्यात आल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठण्यासही सुरूवात झाली आहे.

पश्चिम रेल्वेमार्गावरही अशीच काहीशी स्थिती आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरची लोकलसेवा ३० मिनिटे उशिराने सुरू आहे.  नालासोपारा आणि वसई या भागात प्रचंड पाऊस पडतो आहे. तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्येही पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या सेवेवरही झाला आहे. इतकंच नाही तर हार्बर रेल्वे मार्गावरही पावसाचा परिणाम झाला आहे. काल उशिराच्या शिफ्टमध्ये काम करून घरी परतणाऱ्यांना आणि आज सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी घर सोडलेल्या सगळ्यांनाच लोकल सेवा विस्कळीत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाई झाली, यंदा मुंबईची तुंबई होणार नाही असे दावे केले जातात. मात्र मुंबईत अशी वेळ येतेच की ज्यामुळे तिचा वेग मंदावतो. गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिली. त्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे प्रचंड पाऊस झाल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे.

रात्री १ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड या ठिकाणी MH ४७ ०४८४ ही कार पाण्यात वाहून गेली होती. या कारमध्ये तिघेजण अडकले होते. त्यांना बाळकुम अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. ही कार मात्र पाण्यात अडकलीच आहे. तर ठाण्यातल्या नौपाडा भागात असलेल्या भास्कर कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी TDRF च्या जवानांनी तिथल्या २५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. या ठिकाणी आणखी १५ नागरिक अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचेही काम सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 6:39 am

Web Title: school closed hospital railway staion water logged as rain lashes mumbai scj 81
Next Stories
1 मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
2 पावसाची झोडपणी सुरूच
3 मध्य रेल्वेच्या अर्धवट कामांचा फटका
Just Now!
X