सुमारे अडीच हजार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सहभागी; परीक्षांवर परिणाम नाही

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (ईसा) सोमवारी पुकारलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनात राज्यातील अडीच हजार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सहभागी होणार आहेत. या शाळांमध्ये परीक्षा मात्र सुरळीत सुरू राहतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी मुख्याध्यापकाऐवजी शालेय वाहतूक व्यवस्थापनावर सोपवावी, मोफत गणवेश, पुस्तके आदी पुरविण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांचा दर्जा वाढण्यासाठी तातडीने ऑनलाइन सुविधा सुरू करावी आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. राज्यातील खासगी इंग्रजी शाळांच्या या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील १४ हून अधिक शालेय संघटना यात सहभागी होणार असल्याचे इसाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सांगितले. या आंदोलनाअंतर्गत राज्यभरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या जवळपास अडीच हजार शाळा बंद राहतील. या शाळांमध्ये सुरू असलेल्या परीक्षांमध्ये मात्र कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही, असेही पुढे सिंग यांनी सांगितले. आंदोलनात सहभागी होणाऱ्या शाळांनी पालकांना माहिती दिलेली नाही.

बसमालकही  सहभागी

शाळा बसमालकही आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शाळांसाठी सोमवारी बसची सुविधाही बंद राहणार असल्याचे शाळा बसमालक संघटनेचे अनिल गर्ग यांनी सांगितले.