माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणजे १५ ऑक्टोबर हा दिवस शाळा-महाविद्यालयांमध्ये साहित्यिक, खेळाडू, कलाकार अशा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मात्र एकाच दिवशी हा कार्यक्रम घेण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशामुळे मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणचे ‘सेलिब्रिटी’ शाळाशाळांमध्ये कार्यक्रमाकरिता ‘बुक’ झाले होते. परिणामी अनेक शाळांची आदल्या दिवसापर्यंत ‘सेलिब्रिटीं’साठीची धावाधाव संपली नव्हती.

दप्तरातील नेहमीच्या पाठय़पुस्तकांना एक दिवसाची सुट्टी देऊन आपल्या आवडीची इतर पुस्तके शाळेत नेऊन वाचनाचा मुक्त आनंदोत्सव साजरा करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मुंबईत हा उपक्रम ‘वाचू आनंदे’ या नावाने साजरा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांमधील वाचनाची गोडी वाढावी तसेच कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय असूच शकत नाही, हे विद्यार्थ्यांवर बिंबविण्यासाठी मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर येथील तब्बल १५ हजाराहून अधिक शाळांमध्ये गुरुवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर महाविद्यालयांमध्येही हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आदेश उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. मात्र अनेक सेलिब्रिटींना इतर शाळा-महाविद्यालयांनी ‘बुक’ केल्याने बोलवायचे तरी कुणाला, असा प्रश्न काही शाळांना पडला.

=-=-=