पावसाळी सुट्टीपाठोपाठ आता निवडणुकीमुळे शैक्षणिक सत्राचे नुकसान; अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी धडपड

यंदा अतिवृष्टीमुळे देण्यात आलेल्या सुट्टय़ा, त्यापाठोपाठ गणेशोत्सवाची आठवडाभराची सुट्टी आणि आता विधानसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक व्यग्र होणार असल्याने बुडणारे वर्ग या साऱ्यांमुळे यंदा शाळांच्या पहिल्या शैक्षणिक सत्राचे नियोजन कोलमडले आहे. सुट्टय़ांमुळे बराच अभ्यासक्रम शिकवणे बाकी राहिल्याने अनेक शाळांनी आता जास्त तास घेणे, सुट्टय़ांच्या दिवशी नियमित वर्ग भरवणे असे उपाय सुरू केले आहेत.

मुंबईसह संपूर्ण महामुंबई क्षेत्रात यंदा पावसाच्या निमित्ताने बऱ्याच सुट्टय़ा द्याव्या लागल्या. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मुसळधार पावसामुळे सुट्टी द्यावी लागली. जुलै अखेरीस पुन्हा एकदा पावसामुळे शाळांना दोन वेळा सुट्टी द्यावी लागली. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दोन आणि आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात दोन सुट्टय़ा अशा जवळपास सात ते आठ सुट्टय़ा शाळांना द्याव्या लागल्या. पावसामुळे दरवर्षीच सुट्टय़ा द्याव्या लागत असल्या तरी यंदा त्यांची संख्या जास्त होती. त्याचबरोबर यंदा गणेशोत्सवाची सुट्टीही जवळपास आठवडाभर द्यावी लागली. अनेक शाळा गणेशोत्सवाची सलग सुट्टी न देता चतुर्थीच्या दिवशी, गौरींच्या दिवशी सुट्टी देतात. मात्र शिक्षण विभागाने सुट्टी देण्याबाबत परिपत्रक काढल्यामुळे गणेशोत्सवाचीही सलग सुट्टी द्यावी लागली. सत्रातील अध्यापनाचे जवळपास पंधरा दिवस यंदा कमी झाले.

त्यातच ऑक्टोबरच्या मध्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरी त्या गृहित धरून ऑक्टोबरमध्यापर्यंतच अध्यापनाचे काम शिक्षकांना संपवावे लागणार आहे. शिक्षकांना निवडणुकीचीही कामे करावी लागणार आहेत. त्याचे प्रशिक्षण, निवडणुकीचा दिवस, आदला दिवस आणि त्यानंतरचा दिवस असे गृहीत धरून त्यातही अनेक शिक्षकांचे चार ते पाच दिवस जाणार आहेत.

अकरावीचे वर्गच ऑगस्टमध्ये सुरू झाले आहेत. त्यातच अनेक महाविद्यालयांमध्ये अजूनही प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे पहिल्या सत्रात अध्यापनासाठी जेमतेम दीड महिना मिळाला असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यातच नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळे वर्ग घेऊन शिकवावे लागत आहे. त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पहिल्या सत्राचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे.बुडलेल्या दिवसांच्या तासिका भरून काढण्यासाठी आता शाळांनी सकाळच्या सत्रातील वर्गाची वेळ वाढवणे, सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त तासिका घेणे असे उपाय शाळा करत आहेत. ‘पालकांची बैठक घेऊन त्यांना शाळेची वेळ वाढवणे किंवा सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त तासिका घेणे असे उपाय करावे लागणार आहेत. सणांच्या सुट्टय़ा नाहीत, तरी रविवारीही वर्ग भरवावे लागणार आहेत,’ असे हिल्डा कॅस्टेरिओ या शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत रेडीज यांनी सांगितले. ‘निवडणुका लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन त्यानुसार करावे लागणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसारच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. सुट्टय़ा आणि निवडणुका सगळेच एकदम आल्यामुळे सत्राच्या नियोजनात काहीसा बदल करावा लागू शकतो,’ असे बोरीवलीच्या शेठ जी. एच. हायस्कूलच्या उज्ज्वला झारे यांनी दिली.  ‘अकरावीचे वर्गच यंदा उशिरा सुरू झाले. त्यात आलेल्या सुट्टय़ांमुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि प्रात्यक्षिके पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळत आहे. त्यासाठी सुट्टय़ांच्या दिवशी अतिरिक्त तास घेण्याचा विचार आम्ही करत आहोत,’ असे सायली इंटरनॅशनल कोर्सचे आशीर्वाद लोखंडे यांनी सांगितले.