‘एमआयजी क्लब’ला ५४ कोटींचा दंड!

वांद्रे येथे मोक्याच्या ठिकाणी असलेला म्हाडाचा राखीव भूखंड केवळ ५० रुपये प्रति चौरस फूट दराने भुईभाडय़ाने मिळविणाऱ्या ‘एमआयजी क्लब’ने १५ वर्षे उलटली तरी तेथील शाळेला इमारत बांधून दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी म्हाडाने क्लबला ५४ कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे.

वांद्रे पूर्व येथील एमआयजी वसाहतीतील क्रीडांगण, पॅव्हेलियन आणि क्लब हाऊससाठी राखीव असलेला सुमारे १७ हजार ४३७ चौरस मीटर भूखंड म्हाडाने ‘एमआयजी क्लब’ला फक्त ९४ लाख ३७ हजार ५९९ रुपयांना २००३ मध्ये ३० वर्षांच्या भुईभाडय़ाने दिला. या भूखंडावर ‘एमआयजी क्लब’ने क्लब बांधून त्याचा व्यापारी वापर सुरू केला आणि कोटय़वधी रुपये कमावले. भूखंड भाडय़ाने देताना त्यावर असलेल्या माध्यमिक शाळेसाठी तळमजल्यासह चार मजल्यांची इमारत बांधून देण्याची अट होती; परंतु १५ वर्षे उलटल्यानंतरही क्लबने शाळेची इमारत बांधली नाही. या प्रकाराची दखल घेऊन मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या मुख्याधिकाऱ्यांनी क्लबला ५४ कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. शाळेची  इमारत बांधण्यासाठी ५४ कोटींचा खर्च अपेक्षित असून तेवढी रक्कम एमआयजी क्लबने दंड म्हणून म्हाडाकडे जमा करावी, असेही नोटिशीत म्हटले आहे.

म्हाडाच्या नोटीसला क्लबने उत्तर दिले आहे. महापालिकेच्या विकास प्रस्ताव विभागाने १९९६ मध्ये या शाळेसाठी तळ अधिक तिसरा मजला अशी इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र शाळेच्या जागेचा वापर पालिका अतिक्रमण निर्मूलनातून जप्त केलेली मालमत्ता ठेवण्यासाठी करीत होती. हा भूखंड रिकामा करून मिळावा, यासाठी क्लबने पालिकेला वेळोवेळी पत्रे पाठविली; परंतु पालिकेने दाद दिली नाही. अखेरीस २५ मार्च २०१५ मध्ये शाळेचे बांधकाम सुरू करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. सध्याच्या शाळेतील दोन खोल्या स्थलांतरित करण्यासाठी शाळेला दोन नव्या खोल्या बांधून देण्यात आल्या; परंतु शाळेने काहीही प्रतिसाद दिला नसल्याने बांधकाम करता आले नाही, असे क्लबचे मानद सचिव निकुंज व्यास यांनी पालिकेला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. क्लबची काहीही चूक नसल्यामुळे दंड भरण्याची नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणीही व्यास यांनी केली आहे.

‘एमआयजी क्लब’ने अटींचे उल्लंघन केले आहे. त्यांनी एक तर शाळा तात्काळ बांधून दिली पाहिजे वा शाळा बांधण्यासाठी दंडाची रक्कम जमा केली पाहिजे. याबाबत कुठलीही तडजोड होणार नाही.    – मधु चव्हाण, सभापती, मुंबई गृहनिर्माण मंडळ