विद्यार्थ्यांशी संवाद साधून गैरप्रकारांबाबत जनजागृती

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

धुळवडीच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आदल्याच दिवशी शाळा, महाविद्यालयांबाहेर रंगणारी टोळक्यांची होळी इतर अनेक विद्यार्थ्यांसाठी मात्र त्रासदायक ठरते. शिक्षणसंस्थेच्या परिसराच्या बाहेर होणाऱ्या दंग्यावर संस्थांचे नियंत्रण नसले तरी मुलांशी संवाद साधून जागृती करण्याचे उपक्रम शाळांमधून सुरू झाले आहेत.

महाविद्यालयांच्या परिसरात होळी, रंगपंचमी खेळण्यासाठी बंदी आहे. काही गैरप्रकार घडू नयेत म्हणून महाविद्यालयांचे व्यवस्थापन सर्वतोपरी काळजी घेते. परिसराची सुरक्षा वाढवली जाते आणि बहुतेक वेळा सायंकाळी लवकर प्रवेशद्वार बंद केले जाते. असे असले तरी महाविद्यालयाच्या परिसराबाहेर होळी रंगतेच. येणाऱ्या-जाणाऱ्यांवर रंग टाकणे, पाणी उडवणे, फुगे मारणे असा गोंधळ महाविद्यालयांच्या बाहेर दिसतो. शाळांतील विद्यार्थीही यांत मागे नाहीत. जलरंगाच्या बाटल्या, टय़ूब, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांमधील पाणी वापरून मुलेही होळी खेळतात. अनेकदा यावरून भांडणेही होतात. शाळेच्या परिसराबाहेर हा गोंधळ होत असल्यामुळे संस्था त्याची जबाबदारी घेत नाहीत. मात्र परिसरातील नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आता शाळा, महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना याबाबत आवाहनवजा इशारा देण्यास सुरुवात केली आहे.

‘शिक्षणसंस्थेच्या परिसरात होळी, रंग खेळण्यास बंदीच आहे. त्याबाबतच्या सूचना विद्यार्थ्यांना दिलेल्या असतात. परिसरात काही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाते. परिसराच्या बाहेर आम्ही मुलांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र, मुळात हा परीक्षांचा काळ असल्यामुळे अभ्यासाचे वातावरण असते. त्यामुळे गोंधळ होत नाहीत,’ असे रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुश्री लोकूर यांनी सांगितले. तर, ‘फुगे मारणे, गुलाल उधळणे असे प्रकार बाहेर घडतात. मात्र त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. एकूण सामाजिक जागृतीतून हे प्रकार कमी होतील. महाविद्यालयाच्या पातळीवर आम्ही नोटीस लावतो, विद्यार्थ्यांना आवाहन करतो,’ असे रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देसाई यांनी सांगितले.

विक्रोळीतील नॅशनल हायस्कूलमध्ये होळीच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांकडे रंग आहेत का, याची तपासणी केली जाते. ‘शाळेतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने विद्यार्थ्यांना धाक आहे. शिवाय शाळेबाहेर होळी खेळण्यातील धोकेही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जातात,’ अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक रणजीत सुर्वे यांनी दिली.

बोरीवली पश्चिम येथील सायली इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक आशीर्वाद लोखंडे यांनी सांगितले, ‘मुलांनी शाळेबाहेरच नाही तर त्यांच्या घरीही रस्त्यावर होळी खेळू नये म्हणून आम्ही त्यांच्याशी आधीपासूनच संवाद साधतो. यूटय़ूबवर फुग्यांमुळे होणारी इजा, रंगांची इजा यावर अनेक चांगल्या ध्वनिचित्रफिती आहेत. त्या मुलांना आवर्जून दाखवतो. त्याचा परिणामही दिसतो. होळी खेळणे यावर बंधन असू शकत नाहीत. मात्र, एखादा विद्यार्थी होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगून शाळेत आला तर त्याचा अनुभव, रंग न गेल्यामुळे होणारा त्रास त्याने इतर मुलांना सांगायचा अशी अट मुलांना घातली जाते.’