करोनामुळे गेले दहा महिने बंद असलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा येत्या २७ तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी आणि पालकांची संमती घेऊनच शाळा सुरू होतील आणि त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर के ली जातील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शुक्र वारी जाहीर केले.

पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. नेमके  त्याच काळात काही ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढल्याने सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनावर सोपविला होता. यानुसार राज्याच्या काही भागांत शाळा सुरू झाल्या. पण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या मुंबई महानगर क्षेत्रातील शाळा सुरू झाल्या नाहीत. अद्यापही मुंबई परिसरातील शाळा बंदच आहेत. करोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने तसेच देशाच्या अन्य भागांमध्ये शाळा सुरू झाल्यानेच राज्यातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

झाले काय?

राज्यातील करोनास्थिती आता नियंत्रणात असल्याने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी करोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचना करीत मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यामुळे याबाबतचे नियोजन तसेच करोनाविषयक खबरदारी ही स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली.

मुंबईतील नववी ते बारावीच्या वर्गाबाबत संभ्रम..

मुंबई : मुंबईतील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारीपासून पुढील आदेशपर्यंत बंदच ठेवाव्यात अशी सूचना महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हे नियम बंधनकारक.

इयत्ता नववी ते बारावीप्रमाणेच शाळांमध्ये  विद्यार्थ्यांची दररोज तपासणी (थर्मल चेकिंग) करण्यात येईल. एका विद्यार्थ्यांला एका बाकावर बसविण्यात येईल. तसेच एक दिवसाआड वर्ग भरतील म्हणजेच विद्यार्थ्यांनी आठवडयमतून तीन दिवस शाळेत यावे, अशी अपेक्षा असून दोन सत्रांत शाळा भरविण्यात येतील. विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

* शाळांचे निर्जंतुकीकरण आवश्यक. शिक्षकांची करोना चाचणी करावी लागणार

* आजारी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही

* घरातील नातेवाईक आजारी असल्यास मुलांना शाळांमध्ये पाठविले जाऊ नये