‘एनसीईआरटी’च्या अहवालातील नोंदी; आठवीतील निम्म्या विद्यार्थ्यांना तीन विषयांत ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण

दहावीचे डोळे दिपवणारे निकाल गेल्या दोन वर्षांत जाहीर होत असताना प्रत्यक्षात मुंबईत तरी आठवीच्या विद्यार्थ्यांची अधोगतीच होत आहे. सरकारी यंत्रणेनेच ही अधोगती नोंदविली आहे हे विशेष. केंद्र सरकारच्या यंत्रणेमार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता चाचणी’त गणित, विज्ञान, समाजशास्त्र अशा बहुतेक विषयांमध्ये आठवीच्या जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांना तीस टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत, तर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे तीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. भाषा विषयांमध्ये मात्र मुंबईचा निकाल तुलनेने चांगला लागला आहे.

राज्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांच्या या चाचण्या घेण्यात आल्या. ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’कडून (एनसीईआरटी) घेण्यात आलेल्या या चाचण्यांमधून मुंबईतील विद्यार्थ्यांची गणित, विज्ञान आणि समाजशास्त्रातील कामगिरी कच्ची ठरली आहे. गणितामध्ये विद्यार्थ्यांची अवस्था सर्वात बिकट आहे. आकडेमोड, गणिती संकल्पनांचा व्यवहारातील वापर, अंकगणिताचा वापर अशा स्वरूपामध्ये ही चाचणी घेण्यात आली होती. मुंबई उपनगरे आणि शहरे अशा दोन विभागातील शिक्षण विभागाने निवडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीनुसार मुंबई शहर आणि उपनगरांतील सरासरी ५० टक्के विद्यार्थ्यांना गणितात ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे विज्ञानात ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सरासरी ५० टक्क्यांहून जास्त आहे. समाजशास्त्रामध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० टक्क्यांच्या आसपास असल्याचे चाचणीतून समोर आले.

विज्ञानात मुलांना प्रत्यक्ष उपकरणांचा वापर करणे, रोजच्या हालचाली, घटनांमधील वैज्ञानिक तत्त्वे ओळखणे जमलेले नाही. समाजशास्त्रात कायदा बनवण्याची प्रक्रिया, ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व नकाशावर स्थळे अनेक विद्यार्थ्यांना माहीत नाहीत. मूलभूत हक्कांचीही माहिती विद्यार्थ्यांना पुरेशी नसल्याचे समोर येते आहे.

चाचणीचे निकाल

  • गणितात उपनगर विभागातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण हे ३०.०२ टक्के आहेत, तर शहर भागांत सरासरी गुण ३६.४५ टक्के आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांना ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. उपनगर विभागांत ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ५७.१७ टक्के, तर शहर भागांत ४०.३४ टक्के आहे. या चाचणीत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे उपनगर भागांत २.३३ टक्के तर शहर भागांत २.८० टक्के आहे.
  • विज्ञानात तीस टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे उपनगर भागांत ५६ टक्के तर शहर भागांत ४०.१२ टक्के आहे. याच विषयांतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे १.०८ टक्के आणि २.८८ टक्के असल्याचे दिसत आहे.
  • समाजशास्त्रामध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण उपनगर भागांत २७.४३ टक्के आणि शहर भागांत ५० टक्के आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण उपनगरी भागांत एक टक्काही नाही. ०.८८ टक्के विद्यार्थ्यांनाच ७५ टक्के गुणांचा टप्पा गाठता आला आहे. शहर भागांत ३.१७ टक्के विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले.

भाषेची स्थिती आशादायक

  • मुंबईतील दोन्ही भागांमध्ये भाषांची स्थिती मात्र तुलनेने चांगली आहे. भाषेसाठी विद्यार्थ्यांना उपनगर भागांत सरासरी ५४ टक्के तर शहर भागांत ६६ टक्के मिळाले आहेत. तीस टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे उपनगरांत १७.२८ टक्के आणि शहरांत ५.६८ टक्के आहे. विद्यार्थी वाचन, लेखनात सरस असले तरीही अर्थ कळणे आणि भाषेचा वापर अजूनही नीट करता येत नसल्याचे निरीक्षण या अहवालांमध्ये नोंदवण्यात आले आहे.