पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी प्रेम निर्माण व्हावे म्हणून शाळा प्रवेशाचा पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरू होतील तेव्हा आंब्याच्या पानांचे तोरण, रांगोळी, ढोल-ताशांचा गजर असे उत्साही वातावरण सर्व शाळांमध्ये दिसून येईल. आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील शाळांमध्ये जाऊन हा प्रवेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
राज्यातील सर्व शाळा एकाच दिवशी सुरू करण्याचे धोरण गेल्या दोन वर्षांपासून शालेय शिक्षण विभागाने अवलंबले आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा १७ जूनला सुरू होतील. तर विदर्भातील शाळा २६ जूनला सुरू होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या वर्षभर स्मरणात राहावा या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात यावे, अशी योजना शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आखली आहे.
‘शिक्षण हक्क अधिकारात ठिकठिकाणी विद्यार्थी गळती रोखण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थी गळती रोखण्याच्या दृष्टीने उचललेले एक छोटेसे पाऊल आहे,’ असे दर्डा यांनी सांगितले.