19 October 2019

News Flash

पावसाची हुलकावणी, सुट्टीचा गोंधळ मात्र कायम

मुंबई आणि परिसरातही गुरुवारी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : शाळांच्या सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले असताना शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी बुधवारी मध्यरात्री ट्वीट करून गुरुवारी शाळांना सुट्टी देण्याचे जाहीर केल्यामुळे शाळा आणि पालकांचा गोंधळ झाला. मुंबई , ठाणे, पालघर येथे हवामान विभागाने दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यावर अवलंबून सुट्टी जाहीर केल्यानंतर प्रत्यक्षात गुरुवारी पावसाने दडी मारली.

ठाणे, पालघरसह मुंबई आणि परिसरातही गुरुवारी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. बुधवारी रात्री पश्चिम उपनगरे, ठाणे, पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत होता. बुधवार रात्रीची स्थिती आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यावर विसंबून शिक्षण विभागाने गुरुवारी शाळांना सुट्टी देण्याचे जाहीर केले. शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी याबाबत बुधवारी मध्यरात्री ट्वीट केले. मात्र प्रत्यक्षात गुरुवारी दिवसभर अनेक भागात पावसाचा टिपुसही नव्हता. कोरडाठाक दिवस उजाडलेला पाहून शाळांच्या सुट्टीबाबत पालक आणि शाळांचाही गोंधळ उडला. अनेक शाळांच्या चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे या गोंधळात अधिकच भर पडली.

पावसाची चिन्हे नसल्याचे पाहून मुलांना शाळेत पाठवण्याचे संदेश शाळांनी पालकांना पाठवले. महापालिकेच्या सूचना नसल्यामुळे महापालिकेच्या शाळांनी सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला. अनेक शाळांपर्यंत सुट्टीबाबत निर्णयच पोहोचला नव्हता. सकाळी शाळा भरल्यानंतर रात्री उशिरा शिक्षणमंत्र्यांनी ट्वीट केल्याची माहिती मुख्याध्यापकांना मिळाली. त्यानंतर शाळा सोडायची की सुरू ठेवायची याबाबत संभ्रम निर्माण झाला. शाळांकडून काहीच सूचना न मिळाल्यामुळे पालकही संभ्रमात होते. त्यानंतर मात्र दुपारच्या सत्राच्या शाळा आणि ज्या शाळांच्या परीक्षा होत्या त्या नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे शाळांनी पालकांना कळवले. सकाळच्या सत्रात संभ्रम निर्माण झाला असला तरी दुपारच्या सत्रातील सर्व शाळा सुरळीत भरल्या.

सुट्टी देण्याचे अधिकार कुणाला?

गेल्या वर्षीही पावसामुळे शाळांच्या सुट्टय़ांवरून गोंधळ झाला होता. त्यामुळे पाऊस आणि स्थानिक परिस्थिती पाहून शाळांना सुट्टय़ा देण्याचे अधिकार हे व्यवस्थापन समिती किंवा मुख्याध्यापकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळांबाबत पालिका प्रशासनाने निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र, शिक्षण विभाग, पालिका प्रशासन आणि शाळा यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे सुट्टय़ांवरून चालणारे गोंधळ संपलेले नाहीत. मध्यरात्री शिक्षणमंत्र्यांनी ट्वीट करून सुट्टी जाहीर केल्यानंतर सुट्टी देण्याचा अधिकार मंत्र्यांना आहे का? सकाळी भरणाऱ्या शाळांबाबत मध्यरात्री ट्वीट करून ते पालक, शाळा यांच्यापर्यंत कसे पोहोचणार? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

‘मुख्याध्यापकांना अधिकार दिल्यानंतर मुसळधार पाऊस असताना केवळ शाळेच्या भागात पाऊस नसेल तर ते सुट्टी जाहीर करत नाहीत. शाळेत दूरवरून येणारे विद्यार्थी व शिक्षकही असतात. त्यांची अडचण होते,’ अशी तक्रार एका शिक्षकांनी केली आहे.

‘आपल्याकडे परिस्थितीनुसार पालकांशी संपर्क साधण्याची कोणतीही यंत्रणा नाही. प्रत्येक शाळेने त्यांच्याकडील पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार केले आहेत. त्यावर आम्ही पालकांना आयत्यावेळी काही सूचना किंवा बदल असतील तर त्याबाबत सूचना देतो. शाळा संहितेनुसार परिस्थिती पाहून शाळेला सुट्टी देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना आहेत. त्यानुसार यापूर्वीही पाऊस किंवा काही अडचणी असल्यास मुख्याध्यापक सुट्टी देत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सुट्टय़ांबाबत विभागांमध्ये समन्वय नाही आणि त्यामुळे गोंधळ होतो, असे मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले. ‘शाळा आणि शालेय वाहतूकदारांचा समन्वय असतो. सुट्टय़ा देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांनाच असावेत. मुख्याध्यापकांनी वाहतूकदार व पालकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा,’ असे शालेय वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.

मुलांना ठेवायचे कुठे?

‘पाऊस असला किंवा नसला तरी आयत्यावेळी सकाळी आज शाळा भरणार की नाही यावरून गोंधळ झाल्यावर त्याचा पालकांच्या वेळापत्रकावरही परिणाम होते. यंदा ज्या दिवशी सुट्टी जाहीर केली तेव्हा पाऊस पडला नाही, त्यामुळे दिवसभर मुलांना कुठे ठेवायचे याचे नियोजन नोकरी करणाऱ्या पालकांना करावे लागले. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना शाळेला सुट्टी दिली गेली नाही आणि आयत्यावेळी शाळेच्या बस पावसात अडकल्यामुळे मुलांना घेऊन जाण्याची सूचना शाळेने दिली त्यामुळे मुलांना आणण्यासाठी धावपळ करावी लागली. आयत्यावेळी शाळेपर्यंत पोहोचणेही पालकांसाठी कठीण असते. शाळा बुडली तर त्यासाठीही अर्ज द्यावे लागतात आणि अभ्यासही बुडतो. त्यामुळे शाळांच्या सुट्टय़ांबाबत पालकांना वेळेवर संदेश मिळावेत,’ असे मुलुंड येथील पालक रुपाली शानबाग यांनी सांगितले.

ट्वीट करून सुट्टी दिल्यानंतर त्याचा आदेशही निघायला हवा, तो निघत नाही. हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास ठेवणेही कठीण झाले आहे. सुट्टी दिल्यानंतर ते दिवस भरून काढायचे असतात. या सत्रात सुट्टय़ाही जास्त झाल्या आहेत. दिवाळी किंवा उन्हाळीच्या सुट्टी कमी करता येत नाही, असे मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

First Published on September 20, 2019 3:35 am

Web Title: schools and parents confused on ashish shelar tweet at midnight over school holiday zws 70