मुंबईतील २५ शाळा, महाविद्यालयांचा समावेश

मुंबई : उपाहारगृहांमध्ये जंकफूड ऐवजी पौष्टिक आणि सकस आहारावर भर देणाऱ्या मुंबईतील २५ शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाकडून गौरविण्यात आले. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये हा गौरव करण्यात आला.

प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्यासाठी शहरातील २५ शाळा महाविद्यालयांनी पुढाकार घेतला असून यामध्ये विलेपार्ले येथील पार्ले टिळक इंग्लिश मीडियम हायस्कूल, विलेपार्ले महिला संघ, एन.पी.के विद्यालय, ग्रीन लॉन मेरी स्कूल (पेडर रोड), जे.बी.सी.एन इंटरनॅशलन स्कूल (परेल), डी.जे. दोषी गुरुकुल इत्यादी शाळांचा सहभाग आहे. विल्सन महाविद्यालय(गिरगाव), सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय(अंधेरी), मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, एस.पी.जैन इन्सिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च इत्यादी महाविद्यालयाचा समावेश आहे.

बालक आणि तरुणाईमधील वाढता स्थूलपणा आणि जडणारे जीवनशैलीशी निगडित आजार रोखण्यासाठी केंद्राने हाती घेतलेल्या मोहिमेचा भाग म्हणून राज्यातील शाळा महाविद्यालयांमधील उपाहारगृहांमध्ये कोणत्या प्रकारचे पदार्थ दिले जावेत, यावर अन्न व औषध प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. सकस आणि संतुलित आहार देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रशासनाने राज्यभरातील ३० हजार शाळांना दिली आहेत.

उपाहारगृहामध्ये कोणते बदल आवश्यक असून कशारितीने करता येतील याची माहिती देण्यासाठी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांसाठी गुरुवारी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी शेफ हरपाल सिंग सोखी यांच्यासह आहारतज्ज्ञ डॉ. जगमित मदान आणि डॉ. जयश्री तोडकर सहभागी झाल्या होत्या.

.. तर कारवाई

राज्यभरातील  ३० हजार शाळांनी मीठ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थाच्या वापरावर निर्बंध न आणल्यास ऑक्टोबरपासून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

उपाहारगृहामध्ये पौष्टिक उपाहार देणे हे म्हणावे तितके सोपे नाही. मार्गदर्शक तत्त्वे यासाठी पुरेशी नाहीत. मुलांपासून ते उपाहारगृह चालक आणि पालकांसोबतही अनेकदा संवाद साधावा लागतो. केवळ पदार्थ बदलून पुरेसे नसते. मुलांच्या आवडीनिवडीही बदलणेही त्याबरोबर आवश्यक आहे. उपाहारगृहामध्ये बदल करण्यासाठी म्हणून जवळपास वर्षभर आम्ही उपाहारगृह बंद ठेवले. अनेक चर्चा, उपायानंतर आता पौष्टिक आहार उपाहारगृहामध्ये सुरू केला आहे.    

– स्वप्ना त्रलोक्य, पार्ले टिळक (इंग्रजी माध्यम) मुख्याध्यापक

२५ शाळा आणि महाविद्यालयांप्रमाणे राज्यातील इतर संस्थांनाही मार्गदर्शक तत्त्वानुसार उपाहारगृहामध्ये पुढील दोन महिन्यात बदल घडवावेत. ऑक्टोबरपासून शाळा आणि महाविद्यालयांची तपासणी केली जाणार असून त्यात याची अंमलबजावणी न झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल.

 – पल्लवी दराडे, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त