राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना १ मे ते १४ जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातील शाळा २८ जूनपासून, तर उर्वरित राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुट्यांबाबत विभागीय शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना माहिती दिली.  करोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ विस्कळीत झाले. राज्यभरात जवळपास वर्षभर ऑनलाइन पद्धतीने, काही ठिकाणी काही कालावधीसाठी ऑफलाइन पद्धतीने शैक्षणिक प्रक्रिया झाली. त्यामुळे पहिली ते आठवी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे वर्गोन्नती देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

गेले वर्षभर शाळा बंद असल्याने पुढील वर्षी संसर्गाची स्थिती कशी असेल, प्रत्यक्ष शाळा सुरू होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक, कनिष्ठ महाविद्यालये सध्या बंद आहेत. त्यामुळे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत करोना प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून जे आदेश प्राप्त होतील, ते संचालनालयाकडून पाठवण्यात येतील, असेही जगताप यांनी नमूद केले आहे.

वर्षभरानंतर मोठी सुट्टी

गेल्या मार्च महिन्यापासून शिक्षक ऑनलाइन शिक्षणात गुंतले आहेत. दिवाळीतील आठ दिवसांच्या सुट्टीखेरीज त्यांना वर्षभर मोठी सुट्टी मिळाली नव्हती. आता १४ मेपर्यंत म्हणजे दीड महिना शिक्षकांना सुट्टी मिळणार आहे.

करोना प्रादुर्भावाची स्थानिक परिस्थिती पाहून निकाल जाहीर करावेत. टाळेबंदीच्या काळात निकाल घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येऊ नये. ऑनलाइन पद्धतीने किंवा अन्य पर्यायांचा वापर करून निकाल विद्यार्थ्यांना द्यावेत.

– दत्तात्रय जगताप, प्राथमिक-माध्यमिक शिक्षण संचालक