करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने वापर बंद
प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : मुंबईतील करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने करोना रुग्णांवरील उपचार व विलगीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या महापालिकेच्या शाळाही मुक्त झाल्या आहेत. करोना काळजी केंद्र, आरोग्य केंद्र, जम्बो केंद्र म्हणून वापरण्यात येणाऱ्या ३४ शाळा आता पुन्हा पालिकेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. आता पालिकेच्या ३८ शाळा रुग्ण विलगीकरणासाठी वापरण्यात येत आहेत.
करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांनाही विलगीकरणात ठेवण्याचा तोडगा प्रशासनाने काढला. त्यासाठी तातडीने विलगीकरण केंद्रे उभारणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने पालिका शाळांमध्ये विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ठिकठिकाणच्या ७२ शाळा विलगीकरणासाठी उपलब्ध करण्यात आल्या. या शाळांमध्ये तातडीने खाटांची आणि आवश्यक त्या बाबींची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयितांची तेथे रवानगी करण्यास सुरुवात झाली.
मुंबईमध्ये करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक ठिकाणी करोना काळजी केंद्र, करोना आरोग्य केंद्र आणि करोना जम्बो सुविधा केंद्रे उभारण्यात आली. जम्बो सुविधा केंद्र उपलब्ध झाल्यामुळे प्रशासनाने एका विभाग कार्यालयाच्या हद्दीत दोन करोना केंद्रे सुरू ठेवून उर्वरित केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. माहीम येथील निसर्ग उद्यानासमोर मोठे करोना आरोग्य केंद्र उभारण्यात आल्यानंतर धारावी म्युनिसिपल शाळेतील करोना काळजी केंद्र बंद करण्यात आले.
त्यानंतर मुंबईतील अन्य ठिकाणच्या पालिका शाळांमधील करोनाविषयक केंद्रे बंद करण्यात आली. एकूण ७२ पैकी ३४ शाळांमधील करोना काळजी केंद्रे बंद करण्यात आली असून या शाळा शिक्षण विभागाला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. करोना काळजी केंद्र बंद केल्यानंतर या शाळांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. आजघडीला पालिकेच्या ३८ शाळांचा वापर विलगीकरणासाठी होत आहे. या शाळांमध्ये नियमितपणे साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर तात्काळ त्या सुरू करण्यात येतील. पालिकेच्या सर्व शाळांची नियमितपणे देखभाल आणि साफसफाई करण्यात येत आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करून शाळा सुरू करण्यात येतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
विलगीकरणासाठी दिलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने शिक्षण विभागाच्या ताब्यात येत आहेत. तेथे निर्जंतुकीकरण आणि नियमित साफसफाई करण्यात येत आहे. राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर नियमानुसार आवश्यक त्या उपाययोजना करुन शाळा सुरू के ल्या जातील.
– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2020 2:53 am