दीर्घ सुट्टय़ांचे वेळापत्रक घोषित; उन्हाळी, दिवाळीच्या काही सुट्टय़ा गणपती, नाताळसाठी देता येणार

राज्य शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्षांतील सुट्टय़ांचे व शालेय उपक्रमांचे नियोजन केले असून त्यात दीर्घ सुट्टय़ांचे वेळापत्रक परिपत्रकाद्वारे घोषित केले आहे. यात, नेहमीच वादाचा मुद्दा ठरणाऱ्या गणपती व नाताळच्या सुट्टय़ांचे नियोजन करण्याची मुभा शाळांना दिली असून शाळांना उन्हाळी अथवा दिवाळी या दीर्घ सुट्टय़ांमधून काही सुट्टय़ा गणपती व नाताळसाठी देता येणार आहेत. मात्र, या सुट्टय़ांचे नियोजन ३१ जुलैपूर्वी करून ते शिक्षण निरीक्षकांकडे लेखी देण्याचे बंधन शासनाने शाळांवर घातले आहे.

राज्य शासनाने सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांकरीता सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी वार्षिक सुट्टय़ांचे नियोजन घोषित केले असून १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वर्षभरातील उत्सव व जयंतीच्या दिवशी शाळांनी कोणते कार्यक्रम करावेत याच्याही सूचना पत्रकात देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या दिवशी काय कार्यक्रम राबावावेत याची पूर्वसूचना मिळाल्याने शाळांचेही काम आता सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे शाळांना त्यांच्या स्थानिक सुट्टय़ांचे व गरजेनुसार समायोजनाच्या सुट्टय़ा निश्चित करता येणार आहेत. मात्र, ही माहिती शिक्षण निरीक्षकांना ३१ जुलैपूर्वी लेखी कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे लेखी न कळवल्यास शाळांना ऐनवेळी सुट्टय़ा घेता येणार नसल्याचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले. अशी लेखी पूर्व-परवानगी घेण्यामागे सुट्टय़ांचा कालावधी लक्षात घेऊन शिक्षण उपसंचालकांना कामकाजाचे व परिक्षांचे नियोजन करता येणे सोयीचे होणार असून शासनाने घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्टय़ा या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना बंधनकारक असून त्यात बदल करता येणार नाही. तसेच या घोषित करण्यात आलेल्या सुट्टय़ांच्या दिवशी शाळांना पर्यायी सुट्टय़ा घेता येणार नसल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले. तसेच, गणपती व नाताळ सारख्या सणांसाठी सुट्टय़ा शाळांना घ्यायच्या असतील तर शाळा उन्हाळी व दिवाळी सुट्टय़ांतील काही सुट्टय़ा कमी करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे, दरवर्षी या सणांच्या सुट्टय़ांवरून होणारे वाद संपुष्टात येऊन शाळांना यंदा दिलासा मिळणार आहे. याबाबत, हंसराज मोरारजी शाळेचे शिक्षक उदय नरे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, सुट्टय़ांचे व वार्षिक जयंत्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन प्रथमच करून देण्यात आले असून हा चांगला प्रयोग करण्यात आला आहे. जयंतीच्या दिवशी साजरे करण्याच्या कार्यक्रमांची सूचना यापूर्वी त्या दिवसाच्या दोन दिवस आधी परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येत असे. मात्र, यंदा वर्षांचे नियोजन एकत्रच देण्यात आल्याने शाळांचे काम सोपे होणार आहे.

वार्षिक वेळापत्रक

* प्रथम सत्र – १५ जून २०१६ ते २५ ऑक्टोबर २०१६

* दिवाळी सुट्टी – २६ ऑक्टोबर २०१६ ते १२ नोव्हेंबर २०१६

* द्वितीय सत्र – १५ नोव्हेंबर २०१६ ते १ मे २०१७

* उन्हाळी सत्र – २ मे २०१७ पासून