सर्वसमावेशक विकासाकरिता गणित व विज्ञान या विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शन मुंबईच्या पश्चिम शिक्षण विभागातर्फे भरविण्यात येणार आहे. ७ ते ९ जानेवारी दरम्यान अंधेरीच्या चिल्ड्रेन वेल्फेअर हायस्कूलमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यात पश्चिम विभागाच्या सहा प्रभागांतील विजेत्या प्रकल्पांची मांडणी करण्यात येणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री मुख्तार नक्वी, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे, शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण, शिक्षण निरीक्षक बी. डी. पुरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ८ जानेवारीला सहशालेय उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या वेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेत्री झिनत अमान उपस्थित राहणार आहेत. ९ जानेवारीला प्रदर्शनाची सांगता आसाम व नागालँडचे राज्यपाल पी. डी. आचार्य यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, स्थायी समितीचे शैलेश फणसे, देवेंद्र आंबेरकर आदी उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान खुले राहणार आहे.