बांधकामामुळे तलावातील नैसर्गिक झऱ्यांवरील परिणामांबाबत स्पष्टता नाही

मुंबई : वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या शेजारी होणाऱ्या खासगी व्यावसायिकाच्या बांधकामामुळे ही पुरातन वास्तू वा तलावातील नैसर्गिक झऱ्यांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होईल, असे तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट होत नाही. असे असले तरी राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (एनजीआरआय) याबाबत वैज्ञानिक चाचणी करावी आणि २१ एप्रिलपर्यंत आपला अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.

बांधकाम सुरू असताना ही पाहणी करायची आहे. त्यामुळे पाहणीसाठी जाण्यापूर्वी ४८ तास आधी संस्थेने बांधकाम व्यावसायिकाला काम सुरू करण्याबाबत कल्पना द्यावी, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. तज्ज्ञांचा अहवाल येईपर्यंत न्यायालयाने तलावाजवळील खासगी इमारतीच्या बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली होती.

या बांधकामामुळे तलावातील नैसर्गिक झऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येते आहे का, या पुरातन वास्तूवर दूरगामी परिणाम होतील का याची पुरातत्त्व विभागासह अन्य तज्ज्ञ सरकारी प्राधिकरणांच्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीने पाहणी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी तज्ज्ञांच्या समितीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात बांधकामामुळे जलस्रोतांवर व पाण्याच्या दर्जावर काही परिणाम होऊ शकतो का याचा अभ्यास ‘एनजीआरआय’ने करावा.  तसेच त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल मागवण्यात यावा, अशी शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. त्याची न्यायालयानेही दखल  घेतली. खासगी बांधकामामुळे तलाव वा त्यातील नैसर्गिक झऱ्यांवर मोठा परिणाम होईल, असे तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालातून दिसून येत नाही. परंतु पुरातन वास्तूचे, त्यातील तलावांचे संवर्धन केले जावे, तलावातील जलस्रोत अविरत प्रवाही राहावे, पाण्याचा दर्जा खालावू नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच ‘एनजीआरआय’ने याबाबतची आवश्यक ती वैज्ञानिक चाचणी करावी आणि २१ एप्रिलपर्यंत अंतिम अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच त्यानंतर तलावाशेजारील बांधकामाबाबत निर्णय देण्याचे स्पष्ट केले.

खासगी विकासकाकडून केल्या जाणाऱ्या बांधकामामुळे पुरातन वारसा असा दर्जा मिळालेल्या बाणगंगा तलावातील पाणी गेल्या वर्षभरापासून गढूळ झाले आहे. या बांधकामामुळे बाणगंगा तलावातील नैसर्गिक झऱ्यांना धोका निर्माण झाला आहे, असा आरोप गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट या संस्थेने याचिकेद्वारे केली होती. तसेच बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्याची मागणीही केली होती.