17 February 2020

News Flash

विज्ञानाच्या गळचेपीविरोधात ९ ऑगस्टला देशभरात वैज्ञानिकांची निदर्शने

९ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांमधील राजधानीच्या शहरात हा निषेध मोर्चा काढण्यात यावा, असे आवाहन वैज्ञानिकांच्या गटाने केले आहे.

देशातील सर्व विज्ञान संस्थांमध्ये सुरू असलेल्या निधीकपातीच्या निषेधार्थ वैज्ञानिकांनी एकत्रित येऊन निषेध मोर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांमधील राजधानीच्या शहरात हा निषेध मोर्चा काढण्यात यावा, असे आवाहन वैज्ञानिकांच्या गटाने केले आहे.

अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाची कास धरत देशाचा विकास करण्याचा विचार करण्याऐवजी सध्या विज्ञानाला देण्यात येत असलेल्या निधीतही कपात करून विज्ञानाची गळचेपी करण्याचा प्रकार देशभरात सुरू आहे. निधीकपातीमुळे आयआयटी, एनआयटी, आयसरसारख्या संस्थांबरोबरच विज्ञान तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या संशोधनावरही मोठा परिणाम झाला आहे. तसेच सध्या आपण केवळ प्राचीन भारतातील विज्ञानावर विश्वास ठेवू लागलो आहोत. तसेच देशातील उच्चपदस्थांकडून अ-वैज्ञानिक गोष्टींना विशेष महत्त्व दिले जात आहे. देशात सामूहिक मारहाण, ऑनर किलिंगसारख्या घटना घडत असताना त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी विज्ञानच मदत करणार आहे; पण याच विज्ञानाची गळचेपी सुरू आहे. याविरोधात सर्व वैज्ञानिकांनी एकत्रित येऊन दाद मागणे आवश्यक आहे, अशी भूमिका देशभरातील वैज्ञानिकांच्या एका समूहाने केली आहे. एप्रिल महिन्यात जागतिक पातळीवर वैज्ञानिकांनी असेच एक आंदोलन केले होते. अशाच प्रकारचे आंदोलन येत्या ९ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांतील राजधानीच्या शहरांमध्ये वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन करावे, असे आवाहन या वैज्ञानिकांच्या गटाने केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तीन टक्के तरतूद करावी, अशी मागणी या समूहाने केली आहे.

शिक्षणामध्ये विज्ञाननिष्ठ संकल्पनांनाच स्थान द्यावे व पुरावा असलेल्या वैज्ञानिक धोरणांचाच आपण स्वीकार करावा, अशीही या वैज्ञानिकांची प्रमुख मागणी आहे. आवाहन करणाऱ्या विज्ञान समूहामध्ये बंगळुरू येथील विज्ञान संस्थेचे एस. महादेवन, प्रा. एम. आर. एन. मूर्ती, केंद्रीय औषध संशोधन संस्थेचे माजी संचालक नित्या आनंद, कोची विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू बाबू जोसेफ अशा शंभरहून अधिक वैज्ञानिकांचा समावेश आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देत विज्ञानाला देशाभिमानाचा दर्जा दिला होता; पण गेल्या काही वर्षांपासून विज्ञानास पूरक निर्णय होत नसल्यामुळे देशात विज्ञानाचे हे स्थान ढासळत गेले. तसेच देशभरात अवैज्ञानिक वातावरण पसरवले जाऊ लागले. विज्ञानाची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती असल्याची भावना देशातील राजकीय तसेच वैज्ञानिक नेतृत्वाकडे नाही. यामुळे देशातील वैज्ञानिक वातावरण कायम राहावे यासाठी वैज्ञानिकांनी एकत्रित येणे आवश्यक आहे.  – प्रा. एस. जी. दाणी, निवृत्त गणिततज्ज्ञ, टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था

 

First Published on July 16, 2017 1:21 am

Web Title: scientist march at 9 august
Next Stories
1 नगरसेवकांच्या मानधनात वाढ
2 मुंबईत पाऊस पेरणी!
3 प्राध्यापक, विद्यार्थ्यांचा उद्या मोर्चा
Just Now!
X