शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी गणेश मूर्ती कारखान्यातून दिवसा बाहेर काढण्यात येऊ नयेत, यासाठी मूर्तिकारांना बजावण्यात आलेल्या नोटिसा पोलिसांनी मागे घेतल्या असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सांगितले. परळ येथील सेंट्रल रेल्वे वर्कशॉप मैदानात असलेल्या मूर्तिकार राजन खातू, विजय खातू आदींना भोईवाडा पोलिसांनी नोटिसा बजावून रात्री नऊनंतरच कारखान्यातून मूर्ती बाहेर काढण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी २५० हून अधिक मंडळांच्या मूर्ती तयार होत आहेत. वाहतूक कोंडीसाठी मूर्तिकारांना जबाबदार ठरविण्यापेक्षा नागरिकांना त्रास होणार नाही, असे वाहतुकीचे नियोजन करून मूर्तिकारांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी विनंती पोलीस आयुक्तांना केली. ती मान्य करण्यात आल्याने मूर्तिकारांना दिलासा मिळाला असल्याची माहिती शेलार यांनी दिली.