मरिन ड्राइव्ह ते कांदिवली किनारी मार्ग सागरी सेतूमार्गे

मरिन ड्राइव्ह ते कांदिवली या सागर किनारी मार्गाची उभारणी करताना त्याची प्रत्यक्ष उपयुक्तता आणि खर्च या गोष्टी लक्षात घेऊन हा मार्ग वरळी ते वसरेवा या सागरी सेतूशी जोडून कार्यान्वित करण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू (सी-लिंक) उभारण्याच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा उपसमितीने मान्यता दिल्याने आता किनारी मार्गाची उभारणी तुकडय़ा-तुकडय़ांत करून तो सागरी सेतूशी जोडण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वाकांक्षी सागरी मार्गाचे (कोस्टल रोड) काम हाती घेतले गेले असतानाच चार दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा उपसमितीने वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या (सी-लिंक) वर्सोव्यापर्यंत विस्तारीकरणास मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मरिन ड्राइव्ह ते वरळी सागरी सेतूला (सी-लिंक) जोडणारा किनारी मार्ग (कोस्टल रोड) मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणार आहे. या साठी आवश्यक असलेल्या परवानग्याही पालिकेला मिळाल्या आहेत. याच वेळी नव्याने मान्यता मिळालेल्या वरळी ते वांद्रे या सागरी सेतूचे वर्सोव्यापर्यंत विस्तारीकरणाचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर पुढे महानगरपालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात वर्सोवा ते कांदिवली पुढे मढ आयलंडपर्यंत किनारी मार्ग (कोस्टल रोड) बांधण्याची योजना आहे. त्यामुळे किनारी मार्गाचा प्रवास वरळी ते वसरेवा या दरम्यान येणाऱ्या सागरी सेतूने होणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील सागरी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून वांद्रे ते वर्सोवा या सागरी सेतूच्या विस्तारीकरणाचे काम केले जाईल.

खरेतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात या दोन्ही मार्गाच्या कामांवरून बरेच वाद झाले होते. सागरी मार्ग उभारण्याची योजना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली होती. शिवसेनेनेही किनारी मार्गाची मागणी लावून धरली. युती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी वजन वापरून या प्रकल्पासाठी पर्यावरणविषयक मंजुऱ्या लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पालिकेच्या वतीने किनारी मार्ग बांधला जात असताना महागडय़ा सागरी सेतूच्या विस्तारीकरणाची आवश्यकताच काय, असा प्रश्नही उपस्थित झाला होता. या वादात सागरी सेतूच्या विस्तारीकरणाचे काम मार्गी लागलेच नाही. आता किनारी मार्ग उभारण्याकरिता महानगरपालिकेने तयारी सुरू केली असतानाच चार दिवसांपूर्वी सागरी सेतूच्या विस्तारीकरणाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा उपसमितीने मान्यता दिली आहे.

किनारी मार्गाचे काम पुढील वर्षी?

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने किनारी मार्गाच्या कामासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. आर्थिक व्यवहार्यतेबद्दल माहिती घेण्यात येत आहे. डिसेंबरअखेर किंवा कंपन्यांनी आर्थिक बाबींसाठी मुदतवाढ मागितल्यास पुढील एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यातील किनारी मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याची योजना आहे.

वरळी ते वसरेवा सागरी सेतू मार्ग

  • एकूण प्रकल्प लांबी – १७.७ किमी
  • प्रत्यक्ष सागरी सेतूचा मार्ग – ९.५ किमी
  • सेतूला जोडणारे मार्ग – ८.२ किमी

बांधकाम कंपन्यांच्या प्रतिसादाबाबत साशंकता

वरळी-वांद्रे सागरी सेतूचे वर्सोव्यापर्यंत विस्तारीकरण आणि किनारी मार्ग ही दोन्ही कामे परस्पर विरोधी होऊ शकतात, अशी टीका होऊ लागली आहे. सागरी सेतूच्या कामाला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत सरकारमध्ये काहीशी साशंकता आहे. वरळी-वांद्रे सागरी सेतूवर वाहतुकीचे प्रमाण कमी असल्याने टोलच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यातूनच वरळी ते वर्सोवासाठीच्या सुमारे दहा हजार कोटींच्या विस्तारीकरणासाठी किती कंपन्या तयारी दर्शवितात याबाबत पायाभूत सुविधाविषयक ‘वॉर रूम’मध्ये चर्चा झाली आहे.