मुंबई किनारपट्टीवर आज(गुरूवार) समुद्राच्या उंचच उंच लाटा उसळ्याने दादर, शिवाजी पार्क, वरळी, नरिमन पॉईंटपरिसरात समुद्राचे पाणी रस्त्यावर आले होते.
शिवाजी पार्क परिसरात तर लाटांचे पाणी थेट रस्त्यापर्यंत येऊन पोहोचल्याने काहीकाळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. लाटांसोबत आलेला कचरा शिवाजी पार्क परिसरातील रस्ते आणि पादचारी मार्गांवर पसरला.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानाहून एका कार्यक्रमाला जात असताना त्यांना हा प्रकार लक्षात आल्याने राज आपल्या कार मधून खाली उतरले आणि माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित परिसरातील नगरसेवकांनीही परिस्थितीची पाहणी करत महापालिकेच्या कर्मचाऱयांना साफसफाईच्या सुचना दिल्या आहेत. लाटांसोबत मोठ्या प्रमाणात कचरा आल्याने आता महापालिका कर्मचाऱयांची कसोटी लागणार आहे.
दरवेळी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने तुंबलेले रस्ते पाहणाऱया मुंबईकरांनी आज मात्र शिवाजी पार्क परिसरात रस्ते चक्क समुद्राच्या पाण्याने तुंबलेले पाहिले. समुद्राच्या या महाकाय लाटांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया परिसरातही समुद्रानजीकच्या रस्त्यावर लाटांचे पाणी शिरले. गेट वे ऑफ इंडियाजवळ ताज हॉटेलपर्यंत समुद्राचे पाणी पोहोचले.
अचानक उठलेल्या या उंच लाटांचे शास्त्रीय कारण अद्याप समजू शकलेले नाही. तरीसुद्धा अरबी समुद्रात ‘नानौक’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने या लाटा उसळ्याचे समजते. या वादळामुळे अंतर्गत भागात पोहोचण्यास मान्सूनला किमान चार दिवस लागणार आहेत. या वादळाची हालचाल किती वेगाने होते, यावर मान्सूनचे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील आगमन अवलंबून असेल. असे हवामान खात्याने वर्तविले आहे.