मुंबईत तयार होत असलेल्या नव्या पोलीस संग्रहालयात मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त सर फ्रॅंक सोटर तुमचं स्वागत करताना दिसू शकतील. कारण, क्रॉफर्ड मार्केटच्या समोरील पोलीस मुख्यालयातून ते बेपत्ता झाले होते. महिन्याभराच्या अथक परिश्रमानंतर मुंबईच्या या पहिल्या पोलीस आयुक्तांचा शोध अखेर संपला आहे. दरम्यान, वरीष्ठ अधिका-यांकडून कोणत्याही परिस्थितीत त्यांचा शोध घ्या असे आदेश देण्यात आले होते.

वर्ष १८६४-८८ या काळात सोटर हे मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त होते. त्यांचा अर्धपुतळा पोलीस मुख्यालयातील प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आला होता. पण कालांतराने हा पुतळा तेथून हटवण्यात आला आणि त्यानंतर तो पुतळा कुठे ठेवला याबाबत मुंबई पोलिसांकडेच माहिती उपलब्ध नव्हती.

फेब्रुवारी महिन्यात पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसळगीकर यांनी पुन्हा एकदा सर फ्रॅंक सोटर यांचा पुतळा शोधण्याचं ठरवलं. तो पुतळा शोधून नव्याने होत असलेल्या पोलीस म्युझियम येथे उभारावा आणि म्युझियमची शान वाढवावी असा त्यांचा विचार होता.  “मी मुंबई पोलिसांत सर्वप्रथम दाखल झालो, त्यावेळी मी देखील त्यांच्या अर्धपुतळ्याला सलाम ठोकला होता. मला आठवतं त्या प्रमाणे सोटर यांचा पुतळा तेथेच होता, पण तो आता कुठेही सापडत नाहीये” असं पडसलगीकर म्हणाले. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिलं आहे. या अर्धपुतळ्याबाबत गूढ वाढत होतं, त्यामुळे माजी पोलीस अधिका-यांना व इतिहास अभ्यासकांनाही फोन करण्यात आले. माजी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सध्याचे पोलिस इतिहासकार रोहिदास दुसार यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. काही सुगावा लागेल या दृष्टीकोनातून जुन्या नोंदीही तपासण्यात आल्या.

साधारण महिनाभर शोध घेतल्यानंतर, भायखळ्याच्या डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम येथे पुतळा असू शकतो असं कुणीतरी म्हणाले. १९७० मध्ये विविध शहरांतून अनेक ब्रिटिश अधिका-यांचे पुतळे येथे हलवण्यात आले होते. तातडीने पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी पोहोचलं, पहिल्या टप्प्यात शोध घेताना तेव्हाही त्यांना अपयशच आले. पण अखेर पहिल्या माळ्यावर शोध घेताना तो अर्धपुतळा सापडला.

अर्धपुतळा शाबूत आहे. आम्ही आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवलं असून तो अर्धपुतळा नव्या पोलीस म्युझियमसाठी आमच्याकडेच राहू द्यावा अशी विनंती केली आहे अशी माहिती पडसलगीकर यांनी दिली. त्यामुळे हा अर्धपुतळा आता इतर माजी पोलीस अधिका-यांच्या फोटो आणि पुतळ्यांसह नव्या पोलीस म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.