२.२४ लाख अति जोखमीच्या, तर ७.२० लाख कमी जोखमीच्या गटात

मुंबई : मुंबईमधील करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नऊ लाख ६१ हजारांहून अधिक व्यक्तींचा पालिकेने शोध घेतला असून त्यापैकी २.२४ लाख व्यक्तींचा अति जोखमीच्या, तर ७.२० लाख व्यक्तींचा कमी जोखमीच्या गटात समावेश आहे. यापैकी काहींना संस्थात्मक विलगीकरणात, तर काही करोना काळजी केंद्र, करोना आरोग्य केंद्रात दाखल आहेत. तर २.९३ लाख व्यक्ती घरातच विलगीकरणात आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये सातत्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिकेकडून उपलब्ध झालेल्या ९ जूनच्या आकडेवारीनुसार मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या ५० हजार ८७८ इतकी होती. त्यापैकी २२ हजार ९४२ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. तर एक हजार ७५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २६ हजार १७८ करोनाबाधित रुग्ण आहेत.

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नऊ लाख ६१ हजार ९०३ करोना संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. या संशयितांची अति जोखीम आणि कमी जोखीम अशा दोन गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. अति जोखमीच्या गटात दोन लाख ४० हजार ९११, तर कमी जोखमीच्या गटात सात लाख २० हजार ९९२ संशयित रुग्णांचा समावेश आहे. यापैकी दोन लाख ९३ हजार ७२० संशयितांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत विलगीकरणात ठेवलेल्यांची संख्या ९८ हजार ३१ आहे. बहुतांश करोना संशयितांना विलगीकरणाचा काळ पूर्ण झाल्याने आणि आरोग्यास कोणताही धोका नसल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. तर आजघडीला २६ हजार ८६१ संशयित संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत ‘करोना काळजी केंद्र-१’मध्ये ८१ हजार ६८७ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.