04 March 2021

News Flash

कांजूरमार्ग स्थगितीमुळे अन्य मेट्रोच्या कारशेडसाठी जागेची शोधाशोध

प्राधिकरणाने पुन्हा एकदा आपल्या अन्य मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी जागेचा शोध सुरू केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३च्या कांजूरमार्ग येथील कारशेडला उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कोंडी झाली आहे. प्राधिकरणाने पुन्हा एकदा आपल्या अन्य मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी जागेचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार जोगेश्वरी- कांजूरमार्ग मेट्रोसाठी पहाडी गोरेगाव येथील जागेची मागणी नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे.

कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ची उभारणी करण्याची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कापरेरेशनवर आहे. तर अन्य सर्व मेट्रो मार्गाची उभारणी एमएमआरडीए करते. मेट्रो-३ प्रकल्पाची आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक लाभ एमएमआरडीएला होणार होता. मंबईत कारशेडसाठी जागेची शोधाशोध करणाऱ्या प्राधिकरणाला कांजूरमार्गची १०२ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वडाळा-ठाणे- कासारवडवली-मेट्रो-४ तसेच जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो-६ मार्गासाठी कांजूरमार्ग येथेच कारशेड उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता. एवढेच नव्हे तर कांजूरमार्ग- बदलापूर मेट्रो १४चे स्थानकासह  एकाच ठिकाणी तीन कारशेड आणि तीन स्थानके  आणि मध्यवर्ती मेट्रो टर्मिनस उभारण्याची योजना प्राधिकरणाने आखली होती. त्यासाठीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबादरी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली होती.

कांजूरमार्गमुळे प्राधिकरणाची सुमारे चार-पाच हजार कोटी रुपयांची बचत होणार होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्राधिकरण आणि राज्य सरकारला धक्का बसला आहे.  प्राधिकरणाने पुन्हा एकदा कारशेडसाठी पूर्वीप्रमाणे जागेचा शोध सुरू के ला आहे. त्यानुसार जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो-६ मार्गासाठी पहाडी गोरेगाव येथे कारशेड उभारण्यासाठी आवश्यक जागा मिळावी अशी मागणी प्राधिकरणाने नगरविकास विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

मेट्रोच्या अन्य प्रकल्पांच्या कारशेडसाठी  पहाडी गोरेगाव येथील जागेसाठी नगरविकास विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. ठाण्यातील मोगरपाडा येथील जागेबाबतही सबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचा नगरविकासमंत्र्यांचा प्रयत्न आहे.

– आर. ए. राजीव, महानगर आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 12:22 am

Web Title: search for space for other metro car sheds due to kanjur route suspension abn 97
Next Stories
1 अटक टाळण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
2 १९ दिवसांत तब्बल साडेदहा हजार घरांची विक्री
3 मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती
Just Now!
X