दंड चुकवणाऱ्यांचे घर शोधून वाहने जप्त करण्याचा विचार वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईसाठी विशेष पथक तयार केले जाणार आहे.

ई-चलन प्रणाली कार्यान्वित झाल्यापासून दंडाची रक्कम भरण्याची जबाबदारी वाहनचालकांवर सोपविण्यात आली. त्यामुळे बजावलेला दंड आणि वसुली यात बरीच तफावत होऊ लागली. आजपर्यंत नागरिकांनी तब्बल २५० कोटींहून जास्त दंड भरलेला नाही.  ही तफावत दूर करण्यासाठी किंवा दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना सुरू केल्या.

नाकाबंदी कारवाईत वाहन अडवून पोलीस दंडाची रक्कम तपासून ती अदा करण्याबाबत वाहलचालकांना विनंती करतात. शिवाय मोबाइल, ई-मेलद्वारे संपर्क साधून दंडाची शिल्लक रक्कम किती याचे स्मरण करून देत ती भरण्याबाबत आवाहन करणे अव्याहतपणे सुरू आहे.

मात्र कठोर कारवाई होत नसल्याने नागरिक विनंती धुडकावून लावतात, दुर्लक्ष करतात. त्यामुळे ज्या वाहनांवर जास्त रकमेचा दंड शिल्लक आहे त्या वाहन मालकांचे घर शोधून काढावे आणि तेथेच चाप (क्लॅम्प) लावून वाहन जप्त करावे, अशा कारवाईचा विचार सुरू असल्याचे वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष पथकाची नियुक्ती..

या कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्याचा विचार आहे. प्रत्येक वाहतूक पोलीस चौकीत असे पथक तयार करून ते आपल्या हद्दीतल्या नागरिकांकडे जातील, दंड वसूल करतील, दंडाची रक्कम न भरल्यास वाहन जप्त करतील. दंडाची रक्कम वसूल झाल्यावरच संबंधित वाहने मोकळी (चाप काढून) केली जातील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.