करोना संसर्गाचे प्रमुख केंद्र बनलेल्या दिल्लीतील ‘तब्लीगी जमात’च्या धार्मिक संमेलनात सहभाग घेऊन परतलेल्यांचे शोधकार्य अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही गांभीर्याने सुरू आहे. हे शोध कार्य प्रामुख्याने केंद्रीय यंत्रणांनी पुरवलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकांआधारे सुरू आहे. या यादीनुसार मुंबई पोलीस सुमारे दिडशे व्यक्तींचा शोध घेत आहेत, अशी माहिती मिळते.

पोलीस मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार तब्लीकी जमातचे धार्मिक संमेल १३ ते १५ मार्चला दिल्लीतील निजामुद्दीन भागातील केंद्रात(मरकज म्हणजे केंद्र) पार पडले. या संमेलनाला देशाच्या सर्वच राज्यांमधील व्यक्तींची उपस्थिती होती. केंद्रीय यंत्रणांनी त्या दिवशी हे केंद्र आणि केंद्राच्या परिघातील ‘डंप डाटा’ मिळवला. म्हणजेच या दोन दिवसांत तब्लीगी जमातचे केंद्र आणि परिघात सुरू असलेल्या सर्व भ्रमणध्वनी क्र मांकांची माहिती मिळवली. त्यातील क्र मांकांची माहिती त्या त्या राज्यांना  देण्यात आली. त्यानुसार राज्य पोलीस मुख्यालयाला एक यादी प्राप्त झाली. त्या यादीतील भ्रमणध्वनी क्र मांक जिल्हावार विभागातून पोलीस आयुक्तालय किं वा जिल्हा अधिक्षक कार्यालयाला पुरविण्यात आले. त्यानुसार मुंबईला सुमारे दिडशे भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त झाले आहेत. भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून संबंधीत व्यक्तीची चौकशी आणि वैद्यकीय चाचणी केली जात आहे.