पालिकेने धूम्रफवारणी, कीटकनाशक फवारणीचा सपाटा लावला असला तरी डेंग्यू, हिवताप, टायफॉइड आणि तापाच्या साथींनी नागरिक हैराण झाले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना पालिकेला मात्र केवळ ७४ रुग्ण आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ऑक्टोबरमध्ये डेंग्यू, हिवताप, टायफॉइड आणि तापाच्या साथीच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला खडसावले होते. त्यानंतर साथींचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी धूम्रफवारणी आणि कीटकनाशकांच्या फवारणीचे काम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. मात्र अद्यापही साथींचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या निम्म्यावर आल्याचा दावा पालिकेने केला आहे.
नोव्हेंबरमध्ये पालिकेला डेंग्यूचे केवळ ७४ रुग्ण आढळले आहेत. तर ऑक्टोबरमध्ये या रुग्णांची संख्या १८९ होती. मुळात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या प्रचंड होती. ऑक्टोबरमध्ये १०,८४१ तापाचे रुग्ण होते. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत पालिकेला ५,८०१ तापाचे रुग्ण सापडले आहेत. नोव्हेंबरमध्ये  हिवतापचे ५५४, टायफॉइडचे ८३ रुग्ण आढळले आहेत.