आधीच विलंब झालेल्या मोसमी पावसाचे राज्यातील आगमन आणखी काही काळ रखडणार आहे. केरळ किनारपट्टीवर दाखल झालेला मोसमी पाऊस कर्नाटकपर्यंत वेगाने पुढे सरकला तरी पश्चिम किनारपट्टीवर वाहणाऱ्या वाऱ्यांची स्थिती अनुकूल नसल्याने राज्याला पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात मोसमी पाऊस अंदमान बेटांवर १७ मे रोजी पोहोचला होता. मात्र, तो पुढे सरकण्यासाठी तब्बल तीन आठवडे लागले. केरळच्या किनारपट्टीवर ८ जूनला धडकल्यानंतर मोसमी पावसाच्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत केरळ तामिळनाडूसह कर्नाटक, आंध्राचा बहुतांश भाग व्यापला. याच वेगाने तो पुढे सरकत राज्यातील दक्षिण कोकण व गोव्यात पुढील ४८ तासांत पोहोचेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, शुक्रवारी वाऱ्यांची स्थिती अचानक बदलल्याने कोकणात आणि पर्यायाने राज्यात मोसमी पावसाचे आगमन उशिराने होणार आहे. मोसमी वाऱ्यांचा जोर कमी झाल्याने येत्या काही दिवसांत तो बंगालच्या उपसागरातच थोडा पुढे सरकेल, असे अनुमान आहे.