आजही आपली अर्थव्यवस्था ज्या वाऱ्यांवर अवलंबून आहे ते वारे जन्माला येण्यापूर्वीच केवळ मातेच्या (पृथ्वीच्या) प्रकृतीवरून तिच्या बाळाच्या भविष्याविषयी अंदाज बांधणयाचा प्रयत्न म्हणजे मोसमी वाऱ्यांचा अंदाज.

दोनच दिवसांपूर्वी मोसमी वाऱ्यांमुळे येणाऱ्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. जूनपासून सप्टेंबपर्यंत साऱ्या देशात किती पाऊस पडेल याचे ढोबळमानाने केलेले विश्लेषण म्हणजे हा अंदाज. ढोबळमानाने अशासाठी की ९६ टक्के पाऊस पडेल याचा अर्थ देशातील सर्व भागात सरासरीपकी ९६ टक्के पाऊस पडेल असा होत नाही तर काही प्रदेशात तो कमी जास्त पडला तरी सर्व प्रदेशांची सरासरी नेहमीपेक्षा चार टक्के कमी भरेल असे केंद्रीय हवामानशास्त्राला वाटते. हवामानशास्त्र विभागाचे अंदाजाबाबत सामान्यजनात अजूनही शंकेची पाल चुकचुकत असली तरी लहरी मोसमी वाऱ्यांबाबत अनुमान काढणे हे तितकेसे सोपे नाही. आणि जगभरातील कोणतीही हवामानशास्त्र संस्था मोसमी वाऱ्यांचा शंभर टक्के अचूक अनुमान लावू शकत नाही. हे लक्षात घेतले तर मागील दहा वर्षांत सात वेळा योग्य अंदाज लावलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कौतुक करावे लागेल.

आजही आपली अर्थव्यवस्था ज्या वाऱ्यांवर अवलंबून आहे ते वारे जन्माला येण्यापूर्वीच केवळ मातेच्या (पृथ्वीच्या) प्रकृतीवरून तिच्या बाळाच्या भविष्याविषयी अंदाज बांधणयाचा प्रयत्न म्हणजे मोसमी वाऱ्यांचा अंदाज. वारे का वाहतात ते साधारण आपल्याला माहिती असते. तापमानामुळे एखाद्या ठिकाणची हवा विरळ झाली की ती पोकळी भरून काढण्यासाठी जिथे हवा दाट आहे तेथून वारे विरळ हवेच्या दिशेने वाहतात. आपल्या पावसासाठीही हेच मूळ तत्त्व लागू होते. पृथ्वी २३ अंशांच्या कोनात कललेली असल्याने तिचा एकच भाग सातत्याने सूर्यासमोर येतो. म्हणजे सहा महिने दक्षिण गोलार्ध व सहा महिने उत्तर गोलार्ध. बहुसंख्य जमिनीचा भाग हा उत्तर गोलार्धात आहे. सहा महिन्यांत उत्तरेकडची जमीन तापली की दक्षिण गोलार्धातील थंड प्रदेशातील वारे उत्तरेकडे वाहू लागतात. मात्र हे वारे वाहतानाही पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे सुरू असल्याने या वारे सरळ न येता वळसा घालून येतात. भारतात हे वारे नर्ऋत्येकडून म्हणजे दक्षिण व पश्चिम दिशांच्या मधून प्रवेश करतात. दर वर्षी काही झाले तरी हे वारे येणारच. ते सांगण्यासाठी कोणत्याही हवामानतज्ज्ञाची गरज नाही. ते आपल्या निसर्गाने निश्चित केलेले शाश्वत सत्य आहे. मात्र हे वारे नेमके केव्हा येणार, किती वेगाने येणार, किती कोनातून वळणार, त्यांच्यासोबत किती बाष्प असणार आणि ते कधीपर्यंत येत राहणार हे मात्र निश्चित नसते व त्याचा अंदाज बांधणे हे हवामानशास्त्र विभागाचे कौशल्य असते.

हे अंदाज बांधण्यासाठी जगभरात अनेक पद्धतीची समीकरणे मांडण्यात आली आहेत. मात्र नदीचे मूळ, ऋषीचे कूळ याचा जसा थांग लागत नाही तसेच वाऱ्यांची अचूक लांबी, रुंदी मोजणारी मोजपट्टी तयार व्हायची आहे. भारतीय उपखंडातील पाऊस हा असंख्य गोष्टींवर अवलंबून असतो. मात्र त्यातील दोन निकष प्रमुख आहेत. एक म्हणजे तीन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात चच्रेत आलेला अल निनो आणि दुसरा म्हणजे बंगालचा उपसागर व अरबी समुद्र यांच्या तापमानातील फरक. अल निनो म्हणजे प्रशांत महासागरावरील पृष्ठभागावरील तापमान. वर्षभरात हे तापमान कमी-अधिक होणे हे स्वाभाविक आहे. या सागरावरील तापमान सरासरीएवढे किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला ला निनो म्हणतात. आपल्याकडे उन्हाळा व हिवाळा हे जसे एकामागोमाग येत असतात, त्याचप्रमाणे प्रशांत महासागरावरील तापमानातही फरक पडत असतो व अल निनो व ला निनो एकामागोमाग येतात. या दोन्ही स्थिती नऊ ते बारा महिने राहतात. मात्र काही वेळा वर्षांहून अधिक काळही एकच स्थिती राहिल्याची नोंद आहे. २०१४ व २०१५ या वर्षांत नेमके आपल्याकडील पावसाळी कालावधीदरम्यान प्रशांत महासागरावरील पृष्ठभागाचे तापमान वाढले होते. प्रशांत महासागर हा विषुववृत्तावर पसरला आहे. त्यामुळे त्याच्या तापमानातील वाढीचा प्रभाव अगदी इंडोनेशियापर्यंत पोहोचतो व या तापमानामुळे मोसमी वाऱ्यांची चालही बदलते असा अंदाज आहे. या वर्षी अल निनो कमकुवत असल्याचा अंदाज आहे.

आता इंडियन ओशियन डायपोलविषयी पाहू. साधारणत: नेहमीच अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान हे बंगालच्या उपसागरच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा एखाद् अंश सें.ने अधिक असते. त्यामुळेच मोसमी वारे अरबी समुद्राकडे खेचले जातात व तेथून ते जमिनीच्या दिशेने प्रवास करतात. काही वेळा या दोन्ही सागरांचे तापमान सारखे असते तेव्हा वारे अरबी समुद्रापर्यंत येण्याची वाट पाहत नाही. आधीच बंगालच्या उपसागरात घुसतात व तेथून पुढे ईशान्येच्या राज्यांकडे पोहोचतात. त्यामुळे तिथे पूर येतो व उर्वरित देश पावसाकडे डोळे लावून पाहतो. या वेळी दोन्ही सागरांचे तापमान एकसारखे आहे. मात्र पावसाच्या मध्यावर अरबी समुद्राचे तापमान थोडे वाढू शकेल अशी आशा हवामानशास्त्रज्ञांना वाटते. याचा अर्थ आधीच्या महिन्यात ते वाढण्याची शक्यता कमी आहे. अल निनो कमकुवत असला तरी तो आहे आणि अरबी समुद्राचे तापमानही वाढलेले नाही या दोन्ही निकषांसोबत इतर पाहण्यांचा अभ्यास लक्षात घेऊन या वेळच्या पावसाची शक्यता ९६ टक्के एवढी वर्तवली आहे.

९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण समजला गेला तरी वेधशाळेच्या अंदाजात पाच टक्क्यांचा फरक पडू शकतो. म्हणजेच ९१ टक्के पावसाची शक्यताही वेधशाळेला वाटत आहेच. अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे ९१ टक्के म्हणजे सर्वदूर, सर्व राज्यांत सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडणार नाही. त्यातही कमी-जास्त प्रमाण असेल, मात्र त्याचा अंदाज जूनमध्ये लावला जाईल. गेल्या वर्षी १०६ टक्के पाऊस होईल हा वेधशाळेने बांधलेला अंदाज फसला होता व देशात ९७ टक्के पाऊस पडला होता. मात्र त्या आधीच्या दोन वर्षांत पाऊस कमी पडेल हे वेधशाळेचे अंदाज खरे ठरले होते. त्यामुळे या वर्षी अंदाज किती खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

prajakta.kasale@expressindia.com