समान जागांची भाजपची खेळी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी १३५ जागा तर मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेले सूत्र जागावाटपात भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक फायदेशीर ठरू शकते. फक्त शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा निवडून येण्याच्या दृष्टीने अनुकूल असतील का, हा खरा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीचा निर्णय घेताना विधानसभेला मित्रपक्षांच्या जागा वगळता भाजप आणि शिवसेना समान जागा लढवतील, असे जाहीर करण्यात आले होते. भाजप आणि शिवसेना समसमान म्हणजे १३५ जागा लढतील तर उर्वरित १८ जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील, असे जागावाटपाचे सूत्र पाटील यांनी मांडले आहे. चंद्रकांतदादांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच जागावाटपाचे सूत्र जाहीर केले असणार. शिवसेनेला हे सूत्र मान्य आहे का, हे अद्याप स्पष्ट झलेले नाही. पण या सूत्रानुसार भाजपपेक्षा शिवसेनेच्या वाटय़ाला अधिक जागा येत आहेत.

भाजपचे गेल्या वेळी १२२ आमदार निवडून आले होते. ६३  मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तेव्हा भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. सध्याच्या संख्याबळाच्या आधारे तुलना केल्यास भाजपला विद्यमान १२२ आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता फक्त १३ जागा अधिक वाटय़ाला येऊ शकतात. याउलट ६३ आमदार असलेल्या शिवसेनेला सध्याच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त जागा पदरात पडू शकतात. चंद्रकांत पाटील यांच्या सूत्रानुसार शिवसेनेला अधिक जागा वाटय़ाला येणार आहेत. लोकसभा निकालानंतर गेल्या आठवडय़ात चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जागावाटपाचे हे सूत्र सादर केल्याचे सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपकडे इतर पक्षांतून येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. याशिवाय भाजपमधील इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पक्षाची उमेदवारी मिळाल्यास निवडून येणे सोपे आहे याचा पक्षातील नेतेमंडळी आणि इच्छुकांना अंदाज आला आहे. सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही हे स्पष्टच आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर करताना भाजपने २३ पैकी सात माजी खासदारांना पुन्हा उमेदवारी नाकारली होती. हाच कित्ता विधानसभेच्या वेळी गिरविला जाईल, अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघ मिळणार नाहीत हे स्पष्टच होते. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य छोटय़ा पक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघांवर भाजपमधील इच्छुकांचा डोळा होता. शिवसेनेला १३५ आणि मित्रपक्षांना १८ मतदारसंघ सोडल्यास १५३ मतदारसंघ शिवसेना किंवा मित्रपक्षांच्या वाटय़ाला जाणार आहेत. यामुळे भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत विधानसभासंघनिहाय २२८ मतदारसंघांमध्ये युतीला आघाडी मिळाली आहे. यातून युतीचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभेला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

जागा कोणत्या?

शिवसेनेला सहजासहजी अनुकूल ठरेल अशी खेळी भाजप करणार नाही हे स्पष्टच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या अन्य जाणकारांनी कोणत्या जागा शिवसेनेला सोडता येतील याचे ठोकताळे आधीच मांडले असणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांचे मतदारसंघ शिवसेनेला सोडले जाऊ शकतात. शिवसेनेला समान जागा सोडल्या तरीही आपले जास्त आमदार निवडून येतील, अशी खेळी भाजप केल्याशिवाय राहणार नाही. कारण जास्त आमदार निवडून येणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रिपद हे युतीतील सूत्र आहे. यामुळेच भाजपचे जास्त आमदार निवडून येतील आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, याची खबरदारी भाजप जागावाटपात घेईल.

युतीत ठरल्याप्रमाणे मित्रपक्ष वगळता समसमान जागांचे वाटप भाजप आणि शिवसेनेत करण्यात येईल. राज्यात भाजप-शिवसेना युतीला अनुकूल वातावरण असून, चांगल्या जागा जिंकून पुन्हा सत्तेत येऊ.

– चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री