दुसरी वातानुकूलित उपनगरी गाडी महिनाअखेरीस

पश्चिम रेल्वेवर येणाऱ्या दुसऱ्या वातानुकूलित उपनगरी गाडीचा मुंबईतील आगमनाचा मुहूर्त लांबला आहे. चेन्नईच्या रेल्वे कारखान्यातून मुंबईसाठी ही गाडी १५ जानेवारीपर्यंत रवाना केली जाणार होती. मात्र वातानुकूलित यंत्रणेतील समस्येमुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात दुसरी वातानुकूलित उपनगरी गाडी दाखल होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ रोजी पहिली वातानुकूलित उपनगरी गाडी सुरू झाली. या गाडीला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर मात्र प्रवाशांनी त्याला काही प्रमाणात पसंती दिली व यातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळू लागले. तत्पूर्वी दुसऱ्या वातानुकूलित उपनगरी गाडीची बांधणीही करण्याचे कामही हाती घेण्यात आले. ही गाडी पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१८ पर्यंत दाखल होणार होती. त्यांची बांधणी व सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १५ जानेवारी २०१९ पर्यंत ती पश्चिम रेल्वेवर येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आता या उपनगरी गाडीच्या वातानुकूलित यंत्रणेत तांत्रिक समस्या उद्भवल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

उपनगरी गाडी सुरू झाल्यानंतर वातानुकूलित यंत्रणेतून हळूहळू मोठा आवाज येतो. या उपनगरी गाडीमध्ये उच्च विद्युत वातानुकूलित यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे थोडी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. ती दुरुस्त करून उपनगरी गाडी पश्चिम रेल्वेवर दाखल होण्यासाठी जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीचा पहिल्या आठवडा उजाडणार आहे.उपनगरी गाडी दाखल होताच त्याची चाचणी होईल व रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळताच ती प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. उपनगरी गाडी मेट्रोप्रमाणे बैठक व्यवस्था, पहिल्या वातानुकूलित लोकलपेक्षा १० टक्के जादा प्रवासी क्षमता ही वैशिष्टय़े आहेत.