संदीप आचार्य 
मुंबईतील करोनाच्या वाढत्या रुग्णांचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने आता एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना करोनाच्या युद्धात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना ‘करोना योद्धे’ म्हणून नियुक्त करण्यात येणार असून त्यांना ३० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

मुंबईत आजघडीला जवळपास ४० हजार करोना रुग्ण असून जूनच्या मध्यावधी पर्यंत ही संख्या ८० हजाराहून अधिक झालेली असेल. हे कमी ठरावे म्हणून की काय पावसाळ्यात करोनाव्यतिरिक्त मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस व स्वाईन फ्ल्यू आदी साथीच्या आजारांचाही सामना करावा लागणार आहे. करोनासाठी एकीकडे महापालिका रुग्णालयातील खाटा वाढवणे, पालिका रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करणे, तात्पुरती करोना रुग्णालये उभारणे तसेेच दीड लाख लोकांची विलगीकरण कक्षात व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. मात्र यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर व परिचारिकांचे मनुष्य बळ कोठून आणायचे हा यक्षप्रश्न पालिकेपुढे उभा आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून तसेच आरोग्य विभागाकडून काही प्रमाणात मदत मिळेलही मात्र ती पुरेशी ठरणार नाही हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आता राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएस करणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे ‘करोना युद्धे’ असे नामकरण करण्यात आले असून यांना ३० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. महापालिकेच्या शीव, नायर व केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या माध्यमातून ही ‘करोना योद्धा’ भरती केली जाणार आहे. याबाबत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, ही स्वेच्छा योजना असून एमबीबीएसच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांचे जे विद्यार्थी या योजनेत सहभागी होतील त्यांना एका दिवसाचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

यात रुग्णाचा ईसीजी काढणे, रक्तदाब तपासणे, एक्स- रे छाननी तसेच करोना रुग्णांवरील उपचाराची माहिती दिली जाईल. तसेच प्रमुख पालिका रुग्णालयात नियंत्रण कक्षमध्ये काही विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाईल. तेथे हे विद्यार्थी योद्धे फोनवरून रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना रुग्णालयात दाखल होण्याबाबत मार्गदर्शन करतील. ही योजना जाहीर करताच आतापर्यंत एकट्या नायर रुग्णालयात राज्याच्या वेगवेगळ्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ‘करोना योद्धा’ म्हणून काम करण्याची तयारी दाखवल्याचे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. अशाच प्रकारे शीव व केईएमध्येही चांगला प्रतिसाद मिळत असून या सर्व विद्यार्थ्यांनी केलेले काम त्यांच्या बंधपत्रातील काळातून वजा केले जाणार असल्याचेही डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

एकीकडे एपिडेमिक अॅक्ट १८९७ अंतर्गत खासगी डॉक्टरांना पालिकेत एक महिना काम करणे बंधनकारक करूनही पुरेसे डॉक्टर मिळालेले नाहीत. एकट्या मुंबईत हजारो खासगी डॉक्टर असताना वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ साडेचार हजार डॉक्टरांनीच आपले नाव नोंदवले असून प्रत्यक्षात फारच थोडे खासगी डॉक्टर पालिकेत सेवेसाठी फिरकल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर एमबीबीएसच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना ‘करोना योद्धा’ म्हणून पालिका रुग्णालयात कामासाठी घेण्याच्या योजनेला निश्चित प्रतिसाद मिळेल असा आशावाद अधिष्ठात्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.