मुंबई : पालिकेच्या केंद्रावर आज केवळ ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या मात्रेचे लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे दुसरी मात्रा घेणाऱ्यांनीच केंद्रावर जावे. पहिली मात्रा घेणाऱ्यांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. चार दिवस लसीकरण बंद ठेवल्यानंतर उपलब्ध थोडय़ा साठय़ामध्येच दुसऱ्या मात्राधारकांचे लसीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ‘अजून लशीचा पुढील साठा आलेला नाही. मंगळवारी काही साठा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी दुसरी मात्रा असलेल्यांचे लसीकरण केले जाईल’, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

तरुणांसाठी संध्याकाळी साडेसातनंतरही वेळ उपलब्ध

१८ वर्षांवरील अनेकांना लसीकरणाची वेळच निवडणे शक्य झालेले नाही. तेव्हा संध्याकाळी साडे सात वाजल्यानंतरही ही सुविधा सुरू होत असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. पालिकेच्या नायर, राजावाडी, वांद्रे-कुर्ला संकुलातील(बीकेसी) करोना केंद्र, कूपर आणि सेव्हनहिल्स येथे नऊ ते पाच वेळेत नोंदणी करून वेळ प्राप्त झालेल्यांचे लसीकरण केले जाईल. प्रत्येक केंद्रावर ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाईल.