विख्यात एनएम मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमधून डमी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी दुसरा गुन्हा दाखल केला. २०११ साली २२ विद्यार्थ्यांनी डमी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रवेश परीक्षा उत्र्तीण केली होती. या विद्यार्थ्यांची ओळख पटली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या विद्यार्थ्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
प्रख्यात नरसी मोनसी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेची प्रवेश परीक्षा डमी विद्यार्थ्यांच्या (जॉकी) मदतीने देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी केला होता. याप्रकरणी डमी विद्यार्थी बनून परीक्षा देणारा जॉकी आलोक कुमार (३५) याच्यासह सहा जणांना अटक केली होती. २०१३ साली ८७ विद्यार्थ्यांना अशा प्रकारे डमी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने परीक्षा उत्तीर्ण करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी २०११ या वर्षांत २२ विद्यार्थ्यांना डमीद्वारे प्रवेश मिळवून दिल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला आहे. हे विद्यार्थी सध्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बँकामध्ये उच्च पदावर कार्यरत असून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. कायदेशीर सल्ला घेऊनच त्यांच्या अटकेची कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.